आधी मराठा आरक्षणाचा निर्णय, मगच पोलीस भरती घ्या – शिवेंद्रराजे भोसले

shivendra raje bhosale & Uddhav Thackeray

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला असताना राज्य सरकारने मेगा पोलीस भरती प्रक्रियेचा निर्णय घेतला आहे. सरकारची ही भूमिका मराठा समाजासाठी अन्यायकारक आहे. सरकारने आधी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, मगच पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीने पोलीस भरती रद्द करण्याचा निर्णय घ्यावा; अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे की, उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय झाला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. राज्य सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकर हालचाल करावी, अशी सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे.

मात्र शासनाने मेगा पोलीस भरतीची तारीख जाहीर केली आहे. मराठा समाजातील असंख्य कुटुंबे, आर्थिक दुर्बल आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. एकीकडे आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला असताना शासनाने मेगा पोलीस भरतीचा निर्णय घेऊन मराठा समाजातील तरुण, तरुणींवर मोठा अन्याय केला आहे. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून सरकारची ही भूमिका मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अन्यायकारक आहे.

यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होईल. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठवण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलणे आवश्यक आहे. मराठा समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने याबाबत निर्णय घ्यावा. तसेच जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पोलीस भरती घेवू नये. तातडीने भरती प्रक्रिया रद्द करावी अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER