पहिले राज्य निवडणूक आयुक्त देवराम चौधरी यांचे निधन

Devram Chaudhary

मुंबई : राज्याचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त देवराम नामदेव चौधरी (Devram Namdev Chaudhary) (९२) यांचे ३० ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलं आहेत. ते अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त सहआयुक्त सुहास चौधरी यांचे ते वडील होत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद १९९२ मध्ये झालेल्या ७३ आणि ७४ व्या घटना दुरुस्तीत करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात १९९४ मध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. चौधरी यांची पहिले राज्य निवडणूक आयुक्तपदी २६ एप्रिल १९९४ नियुक्ती झाली होती.

चौधरी यांचा जन्म २६एप्रिल १९३० रोजी जळगाव जिल्ह्यातील भालोद (ता. भालोद) येथे झाला होता. त्यांनी जळगाव येथून वकिली व्यवसायाला सुरुवात केली. जळगाव नगरपरिषदेत १० वर्षे विधी सल्लागार म्हणूनही कार्यरत होते. त्यानंतर ते अकोला येथे सहायक धर्मादाय आयुक्त होते. नंतर त्यांची बदली पुणे आणि मुंबई येथे झाली.

त्यांची मंत्रालयात विधी व न्याय विभागात नियुक्ती झाली. कालांतराने विधी व न्याय विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्र स्टेट लॉ कमिशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या (यशदा) नियामक मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून ते निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांची राज्याचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER