आधी संजय राठोड मग विकास मंडळ; आज विरोधकांचा विजेचा शॉक

Devndra Fadnavis-Ajit Pawar

मुंबई :- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला इनमिन दोन दिवस झाले असताना सत्तापक्ष बॅकफूटवर गेलेला दिसत आहे. वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) राजीनामा द्यायला भाग पाडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली लढाई जिंकली. अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्यांवर राजीनाम्याची वेळ येते असे पहिल्यांदाच घडले.

सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित विकास मंडळास मुदतवाढ देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उगाच टीका ओढावून घेतली ती त्यांच्या विधानामुळे. राज्यपालांकडे १२ विधान परिषद सदस्य नियुक्तीचा विषय प्रलंबित आहे. आधी राज्यपालांनी १२ आमदारांची नियुक्ती करावी आम्ही लगेच मंडळांना मुदतवाढ देऊ असे वादग्रस्त विधान अजितदादांनी केले. त्यावर त्यांना खिंडीत पकडले ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी. शेवटी, या मंडळांना मुदतवाढ नक्कीच दिली जाईल आणि राज्यपालांच्या सूत्रानुसारच अर्थसंकल्पीय तरतुदींचे समन्यायी वाटप केले जाईल असे अजित पवार यांना सभागृहात सांगावे लागले. विरोधकांचा हा मोठा विजय होता.

सत्तापक्षाला आज पुन्हा बॅकफूटवर जावे लागले. राज्यातील हजारो वीज कनेक्शन वीज बिल थकबाकीअभावी कापली जात असल्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडून न्याय पदरी पाडून घेण्याच्या इराद्यानेच विरोधक सभागृहात आले होते आणि घडलेही तसेच. कामकाज सुरू होण्यापूर्वी दोन्ही सभागृहांतील भाजपचे सदस्य विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहाचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन कापण्याचे थांबवा अशी आग्रही मागणी लावून धरली. कोरोनाने सामान्य माणूस नागवला जात असताना सरकार कनेक्शन कापत आहे हा तुघलकी प्रकार असल्याचे सांगत त्यांनी कनेक्शन कापण्याला तत्काळ स्थगिती द्या आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर आधी चर्चा करा असे ते म्हणाले. या विषयावर जनतेत असलेला एकूणच रोष लक्षात घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळला आणि कनेक्शन कापण्याची मागणी केली. फडणवीस यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शेवटी अजित पवार यांना वीज कनेक्शन कापण्यास तत्काळ स्थगिती देण्यात येत असल्याचे जाहीर करावे लागले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना फडणवीस यांनी सरकारची अक्षरश: पिसे काढली. जनतेचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याच एका भाषणाचा संदर्भ देत काढला. आदिवासी खावटी, धान घोटाळा, कोरोना काळातील खरेदीचा घोटाळा यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अद्याप एफआयआर दाखल न करणाºया वानवडी पोलीस ठाण्याच्या पोलीन निरिक्षकांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर या भारतरत्नांच्या टिष्ट्वटची चौकशी हे सरकार करणार आहे. त्यांनी देशभक्तीचे टिष्ट्वट केले हा त्यांचा गुन्हा होता का असा सवाल फडणवीस यांनी केला. आता उद्या मुख्यमंत्री ठाकरे हे फडणवीसांच्या आरोपांना काय उत्तर देतात या बाबत उत्सुकता आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचे बंधू व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मात्र आज विधानभवनात होऊ शकली नाही. विविध मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी विधानभवनात येण्याकरता राज कृष्णकुंज या निवासस्थानाहून निघाले होते. पण कोरोना चाचणीचा निगेटीव्ह अहवाल हाती असल्याशिवाय विधानभवनात प्रवेशच नाही असे कळल्याने राज माघारी फिरले.

ही बातमी पण वाचा : ‘नेमके हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय’ : देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER