राष्ट्रपतीपदासाठी आधी सत्ताधाऱ्यांना उमेदवार निवडू द्या – शरद पवार

Sharad Pawar and Sonia
File Pic

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाचा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवितांना समविचारी विरोधी पक्षांनी घाई करू नये. आधी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार समोर येऊ द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे.

जुलैमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपाला शह देण्यासाठी सोनिया गांधींनी स्वत: पुढाकार घेत विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी सीताराम येचुरी, नितीशकुमार, शरद यादव आणि अन्य नेत्यांची भेट घेऊन महाआघाडी निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. लालूप्रसाद यादव, डी. राजा, एम. के. स्टॅलिन यांच्याशीही या अनुषंगाने त्या फोनवरून बोलल्या आहेत. या पदासाठी गोपालकृष्ण गांधी आणि शरद यादव यांची नावे चर्चेत आहेत.

पवार यांनी राष्ट्रपतीपदाच्या मुद्द्यावर बुधवारी सोनिया यांची भेट घेऊन या सध्याच्या राजकीय स्थितीवर अर्धा तास चर्चा केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मुद्द्यावर पवारांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. तुमच्या मनात राष्ट्रपतीपदासाठी कोणी उमेदवार आहे का? त्यावर त्या म्हणाल्या की, अद्याप कोणीही नाही. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाने उमेदवार का द्यावा? उमेदवार देण्यामागचा हेतू स्पष्ट असावा. सत्तारूढ पक्षाने या पदासाठी उमेदवार घोषित करेपर्यंत आपण वाट बघावी, असे तुम्हाला वाटत नाही का? असे पवार यांनी सोनिया यांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रत्येक राज्यात भाजपने मुसंडी मारल्याने विरोधी पक्षात गोंधळ निर्माण झाला असून, आधी त्यांनी आपली स्थिती सावरली पाहिजे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) उमेदवार ठरल्यानंतरच काँग्रेसने चाल चालावी, असे पवार यांचे मत आहे.

भाजपाकडून कोणत्याही हालचाली सुरु नसतांना विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवाराबाबत गाजावाजा करण्यास पवार यांनी विरोध दर्शविला आहे. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केलेले आहे, तसेच महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीतही शक्य त्या ठिकाणी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचा विचार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा विरोधी पक्षनेत्यांची बहुधा मेअखेर बैठक घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.