आधी ‘आयुक्त हटाओ’, आता आयुक्तांचे गुणगान करत शिवसेनेचा यू-टर्न

मुंबई : डोंबिवलीत झालेल्या सर्वपक्षीय कोरोना परिषदेत आयुक्तांना १५ लेखी सूचना देऊ, अंमलबजावणी करण्यासाठी १४ दिवस देऊ आणि तरीही कोरोना कमी झाला नाही तर आयुक्त हटाओ मोहीम चालवू, असा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला होता. मात्र काही तासांतच केडीएमसीतील सत्ताधारी शिवसेनेनं यू-टर्न घेत आयुक्तांची पाठराखण केली आहे.

आयुक्त योग्य पद्धतीने काम करत असून कोरोना वाढतोय तो त्यांच्यामुळे नव्हे, अशी भूमिका शिवसेनेचे (Shivsena) डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे (Rajesh More) यांनी घेतली आहे. त्यामुळे जर शिवसेना आयुक्तांच्या इतकीच पाठीशी होती, कोरोना परिषदेतच या निर्णयाला विरोध का केला नाही? असा प्रश्न आता विचारला जात आहे. कदाचित शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांना पालिकेत आपलीच सत्ता असल्याचा विसर पडला असावा आणि वरिष्ठांकडून दणका बसल्यावर सारवासारव केली जात असावी, अशी चर्चा डोंबिवलीत सुरू आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी डोंबिवलीत सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. लाल बावटा रिक्षा युनियनच्यावतीनं आयोजित कोरोना परिषदेनं सर्वपक्षीयांना एकत्र आणलं. डोंबिवली आणि कल्याणमध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला असून अनलॉक महागात पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, यावर चर्चा करण्यात आली. या परिषदेत शहरातील सर्व पक्षांचे नेते आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

या परिषदेत ठरल्याप्रमाणे आता केडीएमसी आयुक्तांना १५ लेखी सूचना देण्यात येणार असून त्यानंतर १४ दिवस त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. या १४ दिवसांत सूचनांचं पालन झालं नाही आणि कोरोना आटोक्यात आला नाही, तर मात्र आयुक्त हटाओ मोहीम सुरू केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER