
गडचिरोली :- भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त गडचिरोली येथील मुख्य कार्यक्रमासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री, राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्लक्षित विषयांवर लक्ष केंद्रित करून प्राधान्याने सोडविणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील उपस्थित ज्येष्ठ नागरिक, सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार, विद्यार्थी आणि इतर सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता, जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी तसेच यावेळी इतर पदाधिकारी व अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री महोदयांनी जनतेला उद्देशून भाषण केले. तसेच स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या देशभक्तांना आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमारेषेवर प्राणाचे बलिदान देणा-या सैनिकांना तसेच नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांना त्यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित राहावी, तसेच एकीकृत मजबूत भारताच्या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांची आठवण काढणे व त्यांच्या विचारांना आज उजाळा देणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. अखंड भारतासाठी आपण योगदान देण्यासाठी आज संकल्प करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला