मुंबईत उद्यापासून पहिले मराठी समाज माध्यम संमेलन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि डिजिटल मीडिया प्रेमी मंडळींचा उपक्रम

mhnews2 5

मुंबई : सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समाज माध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होणे आवश्यक आहे. या समाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सकारात्मक सर्वांगीण चर्चा घडविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून मुंबईत दोन दिवसीय पहिले राज्यस्तरीय ‘मराठी समाज माध्यम’ संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

उद्या दि. 17 आणि 18 ऑगस्ट 2019 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हे संमेलन होणार असून मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मराठी भाषेत व्यक्त होणाऱ्या लेखक, कवी, अभिनेते, चित्रकार, छायाचित्रकार व विचारवंतांना प्रोत्साहन देण्याचा आणि सामाजिक, भाषिक आणि कलात्मक देवाणघेवाणीतून मराठी भाषेला समृद्ध करण्याचा उद्देश या संमेलनाच्या आयोजनामागे आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात वादविवाद, मुलाखती, करमणुकीचे कार्यक्रम, कविता वाचन, चर्चासत्रे असे अनेकविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन