
विकास वर्मा (Vikas Verma) गेल्या 25-30 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. बॉलिवूडमधील (Bollywood news) कलाकारांना खाजगी सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम तो करीत आला आहे. केवळ बॉलिवूडमधीलच नव्हे तर हॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेता स्टीव्हन सीगलसह अनेक कलाकारांना खाजगी सुरक्षा पुरवली आहे. भारतातील काही राजकीय नेत्यांनाही विकास सुरक्षा पुरवत आला आहे. विकास वर्मा आता पहिला भारत आणि पोलंडचा संयुक्त उपक्रम असलेल्या पहिल्या नो मीन्स नो (No Means No) सिनेमाच्या रिलीजमध्ये व्यस्त झाला आहे. खास महाराष्ट्र टुडेसोबत त्याने या सिनेमाबाबत गप्पा मारल्या.
जी 7 फिल्म्स पोलंड निर्मित ‘नो मीन्स नो’ (पोलिश भाषेत ‘निई म्हणजे नो’) ही एक किशोरवयीन प्रेमकथा असून पोलंडमधील अत्यंत सुंदर अशा लोकेशनवर सिनेमाचे शूटिंग करण्यात आलेले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून पोलंडमध्ये पर्यटन वाढवणे आणि भारत-पोलंडमधील संस्कृतीचा संपर्क अधिक बळकट करण्याचा हेतू आहे. या सिनेमात बॉलिवूड आणि पोलीश कलाकार काम करीत आहेत. गुलशन ग्रोव्हर, शरद कपूर, दीप राज राणा, मिलिंद जोशी, कॅट क्रिस्टियन, नाझिया हुसेन (अभिनेता संजय दत्तची भाची), ॲना अॅडोर, जर्सी हँडझलिक, ॲना गुझिक, नतालिया बाक, स्लिव्हिया झेक आणि पॉवेल झेक या सिनेमात काम करीत आहेत. चित्रपट इंग्रजी, हिंदी आणि पोलिश या तीन भाषांमध्ये एकाचवेळी चित्रित झालेला असून रिलीज होणारा पहिला सिनेमा असल्याचेही विकासने सांगितले.
मिस. माल्गोरझाता पेपेक (पोलिश संसद सदस्य आणि पोलिश व भारतीय संसदीय समूहांच्या अध्यक्ष) यांनी सांगितले, “मला खात्री आहे की ‘नो मीन्स नो’ हा सिनेमा भविष्यात अशा अनेक सहयोगी प्रकल्पांसाठी मार्ग दाखवेल. हा सिनेमा वेळेत पूर्ण केल्याबद्दल आणि विकास वर्मा यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत पोलंडचे उपपंतप्रधान प्रोफेसर पियॉटर ग्लिन्स्की, संस्कृती मंत्रालयाचे प्रभारी आणि पोलंडचे कॉन्सुल जनरल मुंबईचे डेमियन इरिजक यांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे.
पोलंडमधील माजी भारतीय राजदूत (आता कॅनडाचे उच्चायुक्त) अजय बिसारिया यांनी विकास वर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. निर्माता-दिग्दर्शक विकास वर्माने या प्रोजेक्टबाबत बोलताना सांगितले, “नो मीन्स नो हा एक अॅक्शन थ्रिलर असून याची मध्यवर्ती थीम प्रेम आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भारत आणि पोलंडची संस्कृती एकत्र आणण्याचे उद्दीष्ट आहे तसेच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध वाढविण्याचाही प्रयत्न करीत आहोत. या सिनेमाचील स्त्री पात्र खंबीर असून स्त्री सशक्तीकरणावर भर देण्यात आलेला आहे. स्त्रीच्या ‘नकार’चा आदर करावा हे देखील अधोरेखित करण्यात आले आहे असेही विकासने सांगितले.
सिनेमाचा नायक ध्रुव वर्मा असून त्याने पोलंडमध्ये काही महिने राहून क्राव मगा (लष्करासाठी इस्त्रायली लढाईची शैली) आणि जिर्की सॅरिओ डिफेन्डो (युरोपियन पोलिसांसाठी विकसित केलेली डिफेन्सिटी फाईटिंग स्टाईल)चे प्रशिक्षण घेतले असून बार्टेक डोब्रोवोल्स्की यांच्याकडून गन शूटिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. नेमबाजीचे विशेष प्रशिक्षण संजय दत्तकडून घेतले आहे. नृत्याचे प्रशिक्षण शामक दावर यांच्याकडून घेतले आहे.
हा सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज केला जाणार असल्याचे विकासने सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला