चार दशकातील भारतीय क्रिकेट संघातील पहिला पारशी ‘अरझान आहे तरी कोण?

Maharashtra Today

भारतीय क्रिकेट संघात (पुरुष वा महिला) कितीतरी वर्षात म्हणजे सांगायचं झालं तर 28 वर्षात पहिल्यांदाच कुणी पारशी (Parsi) खेळाडू आला..अरझान नागवसवाला ( Arzan Nagwaswalla) हे त्याचे नाव. 1993 मध्ये जुलैत डायना एदुलजी ह्या आपला शेवटचा सामना खेळल्या होत्या. त्या भारतासाठी खेळलेल्या शेवटच्या पारशी क्रिकेटपटू, पुरुषांपुरते बोलायचे झाले तर 1975 मध्ये खेळलेले फारोख इंजिनियर हे शेवटचे पारशी…त्यानंतर आता अरझान. जुलैत इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॕम्पियनशीपचा अंतिम सामना आणि त्यानंतरची इंग्लंडविरुध्दची मालिका यासाठी राखीव खेळाडू म्हणून गुजरातच्या या डावखुऱ्या मध्यमगती गोलंदाजाला स्थान मिळाले आहे.

अरझान नागवसवाला हे नाव बहुतांश क्रिकेटप्रेमींसाठी तसे नवेच असेल कारण त्याचे नाव प्रकाशझोतात यावे, चर्चेत रहावे,असा त्याचा काही कारनामा नव्हता. पण मग झहीर खानची आठवण करून देणारा आणि झहीर खानला आदर्श मानणारा गोलंदाज भारतीय संघात पोहोचला तरी कसा? एक तर तो गुजरातचा खेळाडू आहे हे एक कारण आणि दुसरे म्हणजे त्याची राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधील कामगिरी. त्याने 2019-20 च्या रणजी मोसमात आठ सामन्यात फक्त 18.36 च्या सरासरीने 41 गडी बाद केले होते. त्याचे इनस्विंगर, याॕर्कर आणि बाउन्सर त्या मोसमात चांगलेच प्रभावी ठरले होते. स्वतः झहीर खानने त्याला त्याची गोलंदाजी शैली आपल्यासारखीच असल्याचे एका भेटीत सांगितले होते.

गुजरातमधील उंबरगावनजिकच्या नेरगल या छोट्याशा गावचा हा 23 वर्षीय खेळाडू. त्याच्या गावातच राहिलेला युवा पिढीचा हा एकमेव प्रतिनिधी. त्याच्या पिढीचे इतर सर्वजण मुंबईत आलेले. पण नागवसवाला कुटुंबाला आपले गावच प्यारे…कदाचित याच निर्णयाचा अरझानला फायदा झाला कारण गुजरातकडून खेळायची त्याला लवकर संधी मिळाली आणि आता तो राष्ट्रीय संघापर्यंत येऊन पोहोचलाय.

कितीतरी वर्षात पारशी क्रिकेटपटू भारतीय संघात पोहोचल्याबद्दल तो म्हणतो की, आमच्या समाजासाठी हा आनंद व अभिमानाचा क्षण आहे हे तर नक्कीच. आमच्या समाजाची परंपरा मला माहित आहे. ती पुढे वाढविण्याचा माझा प्रयत्न असेल.

त्याचे सहकारी सांगतात की तो चेंडू दोन्ही बाजूला स्विंग करू शकतो. आणि ताशी 135 च्या वेगाने सातत्याने गोलंदाजी करू शकतो. त्याचा बाऊन्सर फारच खतरनाक असतो. गुडलेंग्थच्या आसपासही चेंडू टाकून तो बाउन्स करू शकतो ही त्याची खासियत आहे. मुंबई इंडियन्ससाठी तो नेट बोलर होता. आता भारतीय संघासोबतही तो केवळ नेट बोलर म्हणून जरी राहिला तरी त्याला भरपूर शिकायला मिळणार आहे असा त्याच्या सहकारी क्रिकेटपटूंना विश्वास आहे.

त्याचा मोठा भाऊ व्हिस्पी हा अरझान क्रिकेटकडे वळल्याचे पहिले कारण. त्याला बघूनच तो क्रिकेट शिकला. 2018-19 मध्ये तो गुजरात रणजी संघात आला आणि मुंबईविरुध्द वानखेडे स्टेडियमवर त्याने पाच बळी मिळवले. पुढच्या मोसमात 41 बळींची कामगिरी झाली. त्यात पंजाबविरुध्द त्याने दोन्ही डावात पाच बळी मिळवले. सौराष्ट्राविरुध्दही त्याने डावात पाच बळी मिळवले. विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांतही त्याने 19 बळी आपल्या नावावर लावले आणि म्हणूनच त्याला राखीव म्हणून का होईना, भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे खुले झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button