काय देणार ठाकरे सरकारची पहिली कोरोना कॅबिनेट?

first Corona cabinet of Thackeray Govt mahavikas aghadi

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी सायंकाळी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत ही बैठक घेतील. काय अपेक्षा आहेत या मंत्रिमंडळ बैठकीकडून? सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक फटका बसला आहे तो शेतमजूर, बांधकाम मजूर, फेरीवाले, माथाडी कामगार, घरेलू कामगार, खाजगी क्षेत्रातील अल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी यांना. त्यांना दिलासा देण्यासाठी उद्धव सरकार काय करते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत याचा कानोसा सोमवारी दिवसभर महाराष्ट्र टुडेच्या टीमने जनमानसातून घेतला. या अपेक्षांचा हा गोषवारा. लॉकडाऊनमुळे ज्या स्थानिक कामगारांचे उत्पन्न पूर्णपणे बंद आहे अशा सर्व रोजंदारी, कंत्राटी, फेरीवाले, बांधकाम कामगार अशा सर्व असंघटित क्षेत्रांतील कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा संच रेशन दुकानांच्या माध्यमातून मोफत देण्यात यावा. लॉकडाऊनमुळे ज्यांना कामावर न जाता घरी थांबावे लागत आहे अशा सर्व कामगारांना पूर्ण पगार देण्यात यावा.

कामाच्या ठिकाणी राहणाऱ्या स्थलांतरित बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, हॉटेल कामगार आदींचे काम बंद आहे व त्यांचे मालक, कंत्राटदार स्वतःच्या घरी आहेत. अशा कामगारांची उपासमार होत आहे. त्यांना तयार फूड पॅकेट दिवसातून दोनदा देण्यात यावे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, औषधे, तपासणी संच, वैयक्तिक सुरक्षा साधने यांचा पुरेशा प्रमाणात तातडीने पुरवठा करावा. हे काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस यांची रुग्णालयाजवळ राहण्याची सोय करावी. वृद्ध व आजारी व्यक्तींना लागणाऱ्या सर्व वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाची मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णालये उपलब्ध होण्यासाठी शासनाने सर्व मोठ्या खाजगी रुग्णालयांचे राष्ट्रीयीकरण करून ती ताब्यात घ्यावीत व त्यांमधील एका मोठ्या विभागाचे विलगीकरण करून त्याचे रूपांतर कोरोना विभागात करावे.

पिवळे कार्ड, केशरी कार्ड असा कोणताही भेद न करता रेशन दुकानांमधून गरिबांना धान्य द्यावे. याशिवाय जीवनावश्यक वस्तू जसे डाळी, तेल, साखर यांचादेखील पुरवठा करावा. आधी विकत मगच मोफत अशी विचित्र अट राज्य सरकारने रेशन दुकानांमधून पुरवण्यात यावयाच्या धान्याबाबत टाकली आहे. अन्न व नागरी पुरवठा खाते हे राष्ट्रवादीकडे आहे आणि त्या पक्षाचे दिग्गज नेते छगन भुजबळ हे या खात्याचे मंत्री आहेत. असे असतानाही अशी विचित्र अट केवळ नोकरशहांच्या आणि रेशन दुकानदारांच्या दबावामुळे टाकण्यात आली. ही अट तत्काळ काढली पाहिजे.

द्राक्ष, केळी आदी फळ उत्पादकांचे प्रचंड नुकसान या काळात झाले आहे. त्यांचा शेतमाल विकत घ्यायला कोणी पुढे येत नाही. युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होते; पण ती आता ठप्प झाली आहे. त्यातच जवळपास २० जिल्ह्यांमधील शेतकरी हा अवकाळी पावसामुळे पार उद्ध्वस्त झाला आहे. या सर्वांसाठीदेखील ठाकरे सरकार काही पॅकेज देणार का, याबाबत उत्सुकता आहे.


Web Title : First corona cabinet of thackeray govt maha vikas aghadi

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)