कर्नाटकमध्ये गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत पहिली अटक

Arrested

बंगळुरू : कर्नाटकमध्ये नुकत्याच लागू करण्यात आलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत पहिली कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी चिकमंगळुरू    जिल्ह्यामध्ये ही कारवाई करत एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी एका क्लिनरला अटक करण्यात आली आहे, तसेच त्याच्याकडे असणारी जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणेबेन्नूर येथून मंगळुरूकडे अवैध नेण्यात येणाऱ्या ३५ गुरांना ताब्यात घेण्यात आले.

चिकमंगळुरूच्या श्रीनगेरी गावात ही कारवाई करण्यात आली. या घटनेमध्ये चालक फरार झाला असून, क्लिनरला ताब्यात घेण्यात आले आहे. तर दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील कैमाना गावामध्ये एका गुरे घेऊन जाणाऱ्या गाडीवर काही अज्ञात लोकांनी हल्ला चढवला. यामध्ये चालकाला जबर मारहाण करण्यात आली. क्लिनर फरार झाला. या चालकावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्यावर अवैध गुरे तस्करी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चालकानेही आपल्याला मारहाण करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विधेयकावरून झाली होती हाणामारी
कर्नाटक विधानपरिषदेमध्ये १५ डिसेंबरला या विधेयकाच्या मंजुरीनंतर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. गोरक्षा विधेयकाच्या मंजुरीवरून  काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये हाणामारी झालेली पाहायला मिळाली. तसेच, सभागृहाच्या उपसभापतींना काँग्रेस आमदारांनी जबरदस्तीने सभागृहाबाहेर काढले. यानंतर हा सर्व गोंधळ थांबवण्यासाठी अखेर मार्शल्सना पाचारण करावे लागले. कर्नाटक विधानपरिषदेने कोणतीही चर्चा न करता गोरक्षा विधेयकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER