महाराष्ट्रात फटाकेबंदीचे कसोशीने पालन केले जाईल

Firecracker ban in Maharashtra

मुंबई :- हवेच्या  प्रदूषणात भर पडून कोरोना (Corona) महामारीचा जोर वाढू नये यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal-NGT) फटाक्यांच्या वापरावर बंदी आणि निर्बंध घालणारे जे आदेश दिले आहेत त्याचे महाराष्ट्रात कसोशीने पालन केले जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयास दिले.

‘एनजीटी’ने ९ नोव्हेंबर रोजी हे आदेश देण्याआधी अनिरुद्ध देशपांडे यांनी तशाच आदेशासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती न्या. ए. के. मेनन व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली तोपर्यंत ‘एनजीटी’चा आदेश झालेला होता. सरकारी वकील पी. पी. काकडे यांनी खंडपीठाचे लक्ष ‘एनजीटी’च्या त्या आदेशाकडे   वेधले व  राज्यात त्या आदेशाचे कसोशीने पालन केले जाईल, असे सांगितले. खंडपीठाने काकडे यांचे हे निवेदन नोंदवून घेतले व देशपांडे यांची याचिका निकाली काढली.

‘एनजीटी’च्या आदेशानुसार जेथील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कायद्याने ठरवून दिलेल्या कमाल मर्यादेहून जास्त आणि खूप जास्त (Poor and more than Average Abient Air Quality) अशा देशभरातील सर्व शहरांमध्ये या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व प्रकारच्या फटाक्यांंची विक्री करण्यास आणि ते वाजविण्यास बंदी आहे. तसेच ज्या शहरांमध्ये हवेचे प्रदूषण मध्यम किंवा त्याहून कमी (  Moderate and less Average Abient Air Quality  ) आहे तेथे दिवाळीत फक्त रात्री ८ ते १० असे दोनच तास फटाके वाजविता येतील.  ज्याने हवेचे प्रदूषण कमी होते अशा ‘हरित फटाक्यां’साठीच (Green Firecrackers) ही मुभा आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील ज्या १२२ शहरांचे वर्गीकरण ‘एरवीही हवेचे प्रदूषण जास्त असलेली शहरे’ ( Containment Cities  ) असे केले आहे त्या शहरांमध्येही ही संपूर्ण बंदी लागू होईल, असे न्यायाधिकरणाने नमूद केले आहे. अशा शहरांमध्ये महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना,  कोल्हापूर, लातूर, बृहन्मुबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे व उल्हासनगर या १८ शहरांचा समावेश आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER