गुजरातच्या ओएनजीसी प्रकल्पात भीषण आग, ४ जण बेपत्ता

Surat - ONGC Plant

सूरत : गुजरातच्या सूरतमध्ये असलेल्या ओएनजीसी गॅस (ONGC Gas) प्रकल्पामध्ये भीषण आग लागली आहे. ही आग फार भयानक असून अजूनही स्फोटाचे आवाज येणे सुरूच आहे. आगीनं हळूहळू रौद्र रूप धारण केलं आणि आगीचे लोळ दिसायला लागले. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. या प्रकल्पामध्ये किती लोक काम करत होते? कोणती जीवितहानी झाली की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

हा प्रकल्प स्वयंचलित असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान स्फोटानंतर ४ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. आजूबाजूच्या गावातील लोकांनी सांगितलं की, ओएनजीसी गॅस प्रकल्पात झालेला स्फोट इतका भयानक होता की, स्फोटाच्या वेळी घराचे दारे खिडक्या भूकंप झाल्यासारखं हादरत होत्या. सूरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी सांगितलं की, आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक तहसीलदार आणि प्रशासनातील अन्य अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत आणि यावर लक्ष ठेवून आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER