डोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग

Fire Chemical MIDC

मुंबई :- डोंबिवली एमआयडीसी फेस-२ मधील मेट्रो पोलिटीन या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली. या कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा आहे. आगीमुळे केमिकलच्या ड्रममध्येही सतत स्फोट सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र आगीमुळे आसपासच्या परिसरात संपूर्ण काळा धूर पसरलेला आहे. कामगारांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी काही जणांना घरी सोडलं आहे.

अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न करीत आहेत. परंतु दोन  तासांपासून आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशमन दलाला अद्याप यश आलेलं नाही.

या आगीमुळे धुराचे मोठे लोळ उठत आहेत. शिवाय परिसरातील रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागाचा दौरा केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना सुरक्षा यंत्रणा राबवा नाही तर कंपन्यांना टाळे ठोका अशी ताकीद दिली होती.

२०१६ मध्ये प्रोबेस कंपनीत अशाच प्रकारे स्फोट झाला होता. त्या स्फोटात तब्बल १२ जणांचा जीव गेला होता.

दरम्यान, गेल्या दोन तासांपासून अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. संपूर्ण परिसरात काळा धूर पसरला आहे. कंपनीत केमिकल साठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. अद्याप घटनेत कोणी जखमी आहे की नाही ते स्पष्ट झाले नाही. कंपनीत नेमकी आग कशामुळे लागली हे आताच सांगता येणार नाही.  सध्याच्या प्राथमिक माहितीनुसार जीवितहानी नाही. आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे- अशी माहिती केडीएमसीचे अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली आहे.