सर्व रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’ची कार्यवाही सुरू : राजेश टोपे

Rajesh Tope

भंडारा :- जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ सुरू आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज विधानसभेत सांगितले.

भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत बालकांच्या मृत्यूबाबत सदस्य गिरीशचंद्र व्यास यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर राजेश टोपे म्हणाले की, “मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची मदत दिली आहे. फायर एनओसी व अन्य आवश्यक एनओसी नसल्यामुळे नव्याने बनविलेले रुग्णालय हस्तांतरित होणार नाही, याची सूचना देण्यात आली आहे. सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, मॉक ड्रील, फायर एनओसी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले.

भंडारा येथील आग दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आले. कंत्राटी तत्त्वावर असलेले बालरोगतज्ज्ञ व दोन स्टाफ नर्स यांच्या सेवा समाप्त केल्या आहेत. तर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांची बदली केल्याचे टोपे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सदस्य परिणय फुके उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER