नागपुरात खाजगी रुग्णालयाला आग; चार जणांचा मृत्यू, मोदींनी व्यक्त केले दुःख

Maharashtra Today

नागपूर : आयुर्वेद तज्ज्ञ असलेले डॉ. राहुल ठवरे यांच्या अमरावती मार्गावरील वाडी येथील वेलट्रीट रुग्णालयात(Well Treat Hospital) काल रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू (4 Die) झाला. सहा रुग्णांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यानं त्यांचे प्राण वाचले. मृतांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. या कोविड हॉस्पिटलच्या दुसऱ्या माळ्यावर असलेल्या अतिदक्षता कक्षात प्रथम आग लागली. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दुःख व्यक्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात एकूण ३१ रुग्ण दाखल होते. रुग्णांना बाहेर काढताना रुग्णालयातील तीन कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेवर पंतप्रधान मोदी म्हणाले, नागपूर येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीचे वृत्त ऐकून दुःख झाले. ज्यांनी या दुर्घटनेत जीव गमावला, त्यांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो. वाडी परिसरात डॉ. राहुल ठवरे यांचं चार मजली रुग्णालय असून, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर रुग्णालय आहे. दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभाग आहे. या विभागात १० रुग्ण होते. अतिदक्षता विभागातील वातानुकूलन यंत्रात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे लक्षात येताच तेथील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर सहा रुग्ण स्वतःहून बाहेर आले. परंतु, जे तीन रुग्ण गंभीर होते त्यांना बेडवरून हलता आले नाही. यात एकाचा घटनास्थळीच, तर दोघांचा दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. या रुग्णालयात संध्याकाळी ६ वाजताच दगावलेल्या एका रुग्णाचा मृतदेहही या घटनेत जळाला.

या रुग्णालयात १८ ते २० कर्मचारी असून, त्यात तीन डॉक्टर आहेत. दुसऱ्या मजल्यावर १० रुग्ण तर तिसऱ्या मजल्यावर १७ बेड असून, त्यातील सर्व रुग्ण सुखरू आहेत. दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात जे सहा रुग्ण बाहेर काढण्यात आले त्यांना मेडिकल मेयोसह दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्तांसह महापालिकेचे अधिकारीही पोहोचले.

घटनास्थळावर मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, स्थानिक अधिकारी तुषार बारहाते, फायरमन शरद दांडेकर, रूपेश मानके, शालीक कोठे, चालक शेंबेकर, सुनील डोंगरे आदींनी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रुग्ण व जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आमदार समीर मेघे यांनी रूग्णांना मदत करण्याचे निदेंश दिले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही फडणवीस यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button