कथित आक्षेपार्ह ट्वीटबद्दल नोंदलेला ‘एफआयआर’ रद्द

BOMBAY HC - twitter - Maharashtra Today
BOMBAY HC - twitter - Maharashtra Today
  • सुनयना होळे यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : समाजाच्या दोन वर्गांमध्ये तेढ निर्माण होऊ शकेल असा व्हिडिओ ट्वीटरवरून प्रसारित केल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने सुनयाना होळे यांच्याविरुद्ध नोंदविलेला ‘एफआयआर’ मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला.

पोलिसांच्या कारवाईविरुद्ध होळे यांनी केलेली याचिका मंजूर करताना न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने म्हटले की, पोलिसांनी ज्याच्यावरून गुन्हा नोंदविला आहे तो होळे यांनी ट्वीट केलेला व्हिडिओ आम्ही बारकाईने पाहिला. त्यात कोणत्याही धर्माचा किंवा समाजवर्गाचा उल्लेख नाही. तो व्हिडिओ  कोणाही कणखर मनाच्या विवेकी व्यक्तीने पाहिला तर त्याच्या मनात तिरस्कार निर्माण होईल, असे आम्हाला वाटत नाही. मुख्य म्हणजे अशी तेढ निर्माण करण्याच्या हेतूने होळे यांनी हे ट्वीट केले होते, असेही आम्हाला त्यावरून दिसत नाही.

न्यायालयाने म्हटले की, भादंवि कलम १५३ ए अन्वये गुन्हा नोंदविण्यासाठी आवश्यक असे कोणतेही घटक या ट्वीटमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे अशा ढिसूळ आधारावर गुन्हा नोंदविणे हा कायद्याचा दुरुपयोग करण्यासारखे आहे. म्हणून आम्ही हा ‘एफआयआर’ रद्द करत आहोत.

खास करून तपास पूर्ण होण्याआधीच ‘एफआयआर’ रद्द करण्यास पब्लिक प्रॉसिक्युटरने आक्षेप घेतला होता. परंतु खंडपीठाने तोही फेटाळून लावला. होळे यांनी केलेल्या एकूण तीन ट्वीटबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर तीन ‘एफआयआर’ नोंदविले होते व होळे यांनी या तिन्हींविरुद्ध तीन स्वतंत्र याचिका केल्या होत्या. त्यापैकी एका ट्वीटबद्दलचा ८ जानेवारी रोजी राखून ठवलेला निकाल आता दिला गेला. होळे यांच्या उतर दोन ट्वीट मुख्यंमत्री उद्धव ठाकरे व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी होती. ही ट्वीट करून आपण सरकारच्या कारभाराविषयी आपली केवळ मते मांडली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आपल्याला तसे करण्याचा हक्क आहे व तो गुन्हा ठरत नाही, असे होळे यांचे म्हणणे होते. या सुनावणीत होळे यांच्यासाठी अ‍ॅड. अभिनव चंद्रचूड यांनी तर पोलिसांसाठी अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर जे. पी. याज्ञिक यांनी युक्तिवाद केला होता.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button