अनुराग ठाकुर, कपिल मिश्रा व परवेश वर्मा यांच्यावर प्राथमिकी दाखल होण्याची शक्यता

अनुराग ठाकुर, कपिल मिश्रा परवेश वर्मा

नवी दिल्ली : दिल्लीत सीएएवरून झालेल्या हिंसाचार प्रकरणी भाजपच्य तीन नेत्यांना कथित प्रक्षोभक भाषणांची तपासणी करून निर्णय घ्या तसेच उद्यापर्यंत न्यायालयाला यासंबंधी माहिती कळवा, असे उच्च न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. यामुळे भाजप नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजपनेते कपिल मिश्रा आणि पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा यांच्यावर एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे.

यावेळी दिल्लीतील १९८४ च्या दंगलीसारखे वातावरण होऊ देणार नाही, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली. यावेळी हायकोर्टात भाजपच्या तीनही नेत्यांच्या भाषणाचे व्हिडिओ दाखवण्यात आले. यावरून दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.

हायकोर्टात मिश्रा, ठाकूर आणि वर्मांविरोधात याचिका करण्यात आली आहे. तिन्ही नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आलीय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून उफाळलेल्या हिंसेत आतापर्यंत ईशान्य दिल्लीत २२ जणांचा मृत्यू झाले आहे.

भाजप नेते कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारीला मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ सीएए समर्थनार्थ रॅली काढली होती. या रॅलीत मिश्रा यांनी प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. यासंबंधी सोशल मीडियावर ट्विटही करण्यात आले होते.