पंढरपुरात आंदोलन केल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकरांसह अनेकांवर गुन्हा दाखल

Prakash Ambedkar - Agitation

पंढरपूर : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असताना लोकांची गर्दी जमवून मास्क न घालता सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे यांच्यासह अन्य लोकांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘विठ्ठल मंदिर खुलं करा,’ या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पंढरपुरात येऊन आंदोलन केले होते. मात्र यावेळी सोशल डिस्टंस्टिंगचा फज्जा उडाला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे यांनी या गुन्ह्याची फिर्याद दिली असून आता सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत काल पंढरपुरात आंदोलन केलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन प्रतिबंधात्मक आदेश असताना प्रकाश आंबेडकर यांनी अकराशे ते बाराशे लोकांचा जमाव जमवला. यावेळी मास्क घातला नाही तसंच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. संचारबंदी व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमामधील तरतुदीचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन घोषणाबाजी केली. यामुळे प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे, धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, सौ. रेखाताई ठाकूर, हभप नामद महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, गणेश महाराज शेटे आणि माऊली हळणवर या नेत्यांसह अकराशे ते बाराशे आंदोलकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER