मंगळसूत्राला ‘कुत्र्याच्या गळ्यातील साखळी’ म्हणणाऱ्या प्रोफेसरविरुद्ध एफआयआर

FIR

नवी दिल्ली : गोव्यातील लॉ कॉलेजमधील (Goa law college) असिस्टंट  प्रोफेसर शिल्पा सिंह (Shilpa Singh) यांनी मंगळसूत्राला ‘कुत्र्याच्या गळ्यातील साखळी’ म्हटल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रीय हिंदू युवा वाहिनीच्या गोव्यातील युनिटचे राजीव झा यांनी तक्रार दाखल केली आहे. असिस्टंट प्रोफेसर शिल्पा सिंह यांनी २१ एप्रिल रोजी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती, त्यात पितृसत्ता आणि सिद्धांतांना  आव्हान देत मंगळसूत्राची तुलना कुत्र्याच्या गळ्यातील साखळीशी केली आहे.

पोंडा, साउथ गोव्यात राहणारे राजीव झा यांनी सिंह यांच्या पोस्टविरोधात गोवा पोलिसात एफआयआर दाखल केला  होता. झा यांनी आरोप केला आहे की, शिल्पा सिंह यांनी हिंदू धर्माबाबत सोशल मीडियावर अपमानजनक कॉमेंट केली आणि धार्मिक भावनांची टिंगल केली. दरम्यान, शिल्पा सिंह यांनी  पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, सोशल मीडियावर मला धमक्यांचे मेसेज  येत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे. या प्रकरणात शिल्पा सिंह यांच्याविरोधात अभाविपनेदेखील कॉलेजमध्ये तक्रार केली होती, ज्यावर कॉलेजने काहीही कारवाई करण्यास नकार दिला.

अभाविपनेही केली तक्रार

अभाविपने आरोप केला की, प्रोफेसर शिल्पा सिंह धर्मविशेषाविरोधात समाजात द्वेषाचे विचार पसरवत आहेत. त्यांना पदावरून तत्काळ हटविण्यात यावे. तक्रारकर्ता राजीव झा म्हणाले की, मला अभाविपच्या तक्रारींबद्दल माहिती आहे, मात्र मी त्यात सामील नाही. माझी तक्रार वैयक्तिक आहे. नॉर्थ गोवाचे एस. पी. उत्कृष्ट प्रसून याबाबत म्हणाले की, शिल्पा सिंह यांच्यावर IPC कलम २९५ – अ (जाणूनबुजून धार्मिक भावना भडकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोंडामध्ये राहणारे राजीव यांच्यावर IPC च्या सेक्शन ५०४ (शांती भंग करण्यासाठी अपमानित करणे), ५०६ (धमकी) आणि ५०९ (महिलेचा अपमान करणे) अंतर्गत केस दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

शिल्पा सिंह यांनी मागितली माफी

आपल्या फेसबुक पोस्टवरून गोंधळ निर्माण झाल्यानंतर प्रोफेसर शिल्पा सिंह यांनी माफी मागितली. त्यांनी लिहिलं की, माझे विचार चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले. माझ्या पोस्टमुळे ज्या महिलांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. लहानपणापासून मी नेहमी या प्रश्नावर विचार करायचे की, लग्नानंतर मॅरिटल स्टेटस सिम्बॉल केवळ महिलांसाठी का गरजेचं आहे? पुरुषांसाठी का नाही? हे पाहून मी निराश आहे. माझ्याबद्दल चुकीचे विचार पसरवले जात आहेत की मी एक ‘अधार्मिक’ आणि देवाचा द्वेष करणारी नास्तिक आहे. हे सत्य नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER