केंद्राने पैसे थकविल्याने राज्यापुढे आर्थिक पेच –सुप्रिया सुळे

Supriya Sule

मुंबई : गेल्या पाच वर्षांत राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली आहे. त्यामध्येच आता केंद्र सरकारकडे वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) १५ हजार कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे राज्य सरकारपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून अर्थसंकल्प तयार करणे कठीण झाले आहे . या सर्व बाबींचा परिणाम विविध विकास योजनांवर होणार असल्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. नगरपालिकेच्यावतीने विविध मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

तसेच विविध विकासकामांचाही शुभारंभ झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी हे सरकार अल्पमुदतीचे ठरून मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत वर्तविले असले तरी त्यात तथ्य नाही. हे सरकार आणखी किमान १५ वर्षे टिकेल असा दावा त्यांनी केला. या सोहळ्यात सुप्रिया सुळे यांच्याबरोबर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले होत्या. नगराध्यक्ष अनुराधा आदिक, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉ. उषा तनपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, कपिल पवार, निर्मला मालपाणी आदी उपस्थित होते. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपट पवार, राहीबाई पोपेरे व जहीर खान यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जहीर खान यांच्या अनुपस्थितीत त्यांची आई झकिया खान व वडील बख्तियार खान यांनी पुरस्कार स्वीकारला.

इंदुरीकर महाराजांवर सुप्रिया सुळेंची टीका