
मुंबई :- मुंबई पोलिसांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत त्यांचा अपमान केल्याप्रकरणी अखेर मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात हा खटला दाखल केला असून यामध्ये मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांच्यावतीनं (Mumbai Police) पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ही तक्रार दाखल केली. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. तसेच मुंबई पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनीही अर्णब गोस्वामी आणि कुटुंबीयांविरोधात अब्रुनुकसानीचा वैयक्तिक दावा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९, कलम ५०० आणि कलम ५०१ अंतर्गत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी मुंबई सत्र न्यायालयात हा दावा दाखल केला आहे.
अलिबागमधील वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी या आधीच अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिलासा दिला होता. नंतरच्या काळात मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याशी संबंधित ब्रॉडकास्ट ऑडियन्स रीसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांना आणि इतर काही लोकांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रीसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. पार्थ दासगुप्ता हे टीआरपी घोटाळ्यातील आरोपी असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचे नाव आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला