अखेर संजय राठोड आज सकाळी पोहरादेवीला येणार ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Sanjay Rathore

वाशिम :  पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर राज्याचे वनमत्री संजय राठोड गेल्या पंधरा दिवसांपासून माध्यमांपासून नॉट रिचेबल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते पोहरादेवीला येणार असे सांगितले जात होते. पंधरा दिवसानंतर आज अखेर ते पोहरादेवीला येणार आहेत. सकाळी साधारण साडेअकराच्या सुमारास संजय राठोड याठिकाणी येतील, अशी माहिती मिळत आहे.

पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. तसेच रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्याचे काम सुरु आहे. जेणेकरून गर्दी जमल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

पोलिसांची पोहरादेवी संस्थानला नोटीस

संजय राठोड पोहरादेवी येथे आल्यानंतर मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पोहरागडावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. येथे कोणत्याही कार्यक्रमाला फक्त 50 जणांना जमण्याची परवानगी आहे. पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला तशी नोटीसही बजावली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मार्गावर कसून तपासणी केली जात आहे.

संजय राठोड यांचा नियोजित कार्यक्रम असा असेल –

1. संजय राठोड हे सकाळी साधारण 9 वाजता आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे जाण्यास निघतील.
2. सकाळी 11.30 वाजता ते पोहरागड येथे पोहचतील.
3. दुपारी एक वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील.
4. दुपारी 2.30 च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील.
5. दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील.
6. यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील.