अखेर संजय भंसाली सुरु करणार हीरा मंडी

Sanjay Leela Bhansali - Heera Mandi

प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भंसालीने (Sanjay Leela Bhansali) जवळ जवळ तेरा वर्षांपूर्वी हीरा मंडी (Heera Mandi) सिनेमाची निर्मिती करणार असल्याचे सूतोवाच केले होते. लाहोरमधील वेश्यावस्तीतील वेश्यांचे जीवन या सिनेमात दाखवले जाणार होते. संजय भंसालीने रानी मुखर्जीला मुख्य भूमिकेत घेण्याचे ठरवले होते. रानीनंतर ऐश्वर्या राय, प्रीति झिंटा, प्रियांका चोप्रा यांचीही नावे चर्चेत होती. परंतु या सिनेमाने आकार घेतला नव्हता. मात्र आता संजय भंसालीने नेटफ्लिक्ससोबत हातमिळवणी केली असून त्यांच्यासाठी हीरा मंडीची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

हीरा मंडी हा संजय लीला भंसालीचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. मात्र काही ना काही कारणामुळे हा प्रोजेक्ट पुढे सरकू शकला नव्हता. नेटफ्लिक्ससोबत चर्चा सुरु असताना संजय भंसालीने हीरा मंडीची कल्पना त्यांच्यापुढे मांडली तेव्हा त्यांना ती खूपच आवडली आणि त्यांनी लगेचच या विषयावर सिनेमा बनवण्यास होकार दिला. मात्र संजय भंसाली दुसऱ्या सिनेमांमध्ये व्यस्त असल्याने त्याने हीरा मंडीच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विभु पूरीवर सोपवली आहे. विभुने संजय भंसालीच्या ऋतिक रोशन अभिनीत ‘गुजारिश’चे संवाद लिहिले होते. आणि 2015 मध्ये आलेल्या ‘हवाईजादा’ सिनेमाचे दिग्दर्शन करून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनीही या विषयावर सिनेमा बनवण्याची तयारी केली होती. परंतु त्यांनाही सिनेमाला आकार देता आला नव्हता. नेटफ्लिक्सने (Netflix) संजय भंसालीला हीरा मंडीसाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले असून यासाठी मोठी रक्कमही संजय भंसालीला दिली जाणार आहे. या सिनेमासोबत नेटफ्लिक्स संजय भंसालीसोबत आणखीही काही सिनेमांचा करार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

हीरा मंडीसाठी आता नव्या कलाकारांची निवड केली जाणार असून पुढील वर्षीच्या मार्च किंवा एप्रिलपासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER