‘अखेर राज ठाकरे आव्हडांची मागणी मान्य’, मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

Uddhav Thackeray - Raj Thackeray - Jitendra Awhad - Maharastra Today
Uddhav Thackeray - Raj Thackeray - Jitendra Awhad - Maharastra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ११ एप्रिल रोजी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि विद्यार्थ्यांनी केली होती. राज ठाकरे यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना फोन करुन हि मागणी केली होती.सर्वच स्तरावरुन होत असलेली मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार थोड्याचवेळात परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल.

काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. आता राज्य सरकारकडून लवकरच 11 एप्रिलची परीक्षा रद्द करण्यात आल्याचा आदेश काढला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोव्हिड विषाणूची लागण होऊ शकते. तर अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वीच कोरोना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

ही बातमी पण वाचा : एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला, राज ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button