अखेर पवारांची सूचना मान्य, उद्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी फ्लॅट्सचं लोकार्पण

Maharashtra Today

मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) रविवारी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे (Tata Cancer Hospital) प्रमुख डॉ. राजेंद्र बडवे यांच्याकडे म्हाडाच्या १०० फ्लॅटच्या चाव्या हस्तांतरित करणार आहेत. परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाजवळ कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना निवारा मिळावा यासाठी शरद पवार यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना सूचना केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठा निर्णय घेत म्हाडाचे १०० फ्लॅटस (100Flats) देण्याचा निर्णय घेतला होता.

राज्य सरकारने ३० एप्रिल रोजी परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी १०० फ्लॅट उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले होते. लालबागमधील हाजी कसम चाळ पुनर्विकास प्रकल्पातील प्रत्येकी ३०० चौरस फूट आकाराचे म्हाडाचे फ्लॅट्स रूग्णालयाला ३० वर्षांच्या कालावधीसाठी नाममात्र दराने दर वर्षी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीला आव्हाड यांनी पवारांची भेट घेतली होती. यावेळी पवार यांनी सर्वात आधी कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फ्लॅट्सच्या चाव्या कधी सोपवणार अशी विचारणा केली होती. आव्हाड यांनी चाव्या हातात आहेत, फक्त तुमची वेळ हवी असे सांगितले होते. यावर पवारांनी याच आठवड्यात चाव्या देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार शरद पवार यांच्या हस्ते उद्या दुपारी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे १०० फ्लॅट्सच्या चाव्या सोपवण्यात येणार असल्याची माहिती आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button