नागपूरकरांच्या मदतीला फडणवीस धावले, १०० बेड्सचे उभारले कोविड सेंटर!

COVID Beds - Nitin Gadkari - Devendra Fadnavis

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) कोरोनाची (Corona) परिस्थिती हाताबाहेर जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पुढाकारातून जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आज नवीन १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज सकाळी रुग्णालयाचे उदघाटन केले. येत्या काही दिवसातच आणखी १०० खाटा येथे उपलब्ध करण्यात येणार आहेत.

या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपुरात अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण सारेच प्रयत्न करीत आहोत. नितीन गडकरी यांनी सुध्दा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे येत्या ४-५ दिवसात स्थिती बऱ्यापैकी सुधारेल. आज सकाळीच आपण नागपूर महापालिकेतील स्थितीचा सुध्दा आढावा घेतला. ५०० बेड आणखी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होतो आहे. काल केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी अतिरिक्त साईट्सला मंजुरी दिली आहे.

आज कोविड संकटाचा आपण सामना करतो आहोत. पण त्यापेक्षा भीतीचे वातावरण अधिक आहे. त्यामुळे समुपदेशनाची प्रक्रिया हाती घेणे ही सुध्दा काळाची गरज आहे. गरज असेल त्यालाच रुग्णालयात दाखल करणे आणि आवश्यकता असेल तेव्हा, रेमडेसिवीरचा वापर यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. काही सामाजिक संघटना आणि भाजपा वैद्यकीय आघाडीच्या मदतीने हे काम हाती घेतले जात आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही सुविधा निर्माण केल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच आणखी विस्तार करण्याचा हितोपदेश केला. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या एनसीआयमध्ये या सुविधेत 20 बेड हे व्हेंटिलेटरसह तर उर्वरित 80 हे ऑक्सिजन बेडस आहेत.

आरटी-पीसीआर चाचण्यांचे अहवाल लवकर येऊन विषाणूचा प्रसार थांबावा, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस हे सातत्याने करीत असताना, आता एनसीआयमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांची सुविधा वाढविण्यात येणार आहे. तसेच सीटी स्कॅन सुविधा सुध्दा कोविड रुग्णांसाठी नाममात्र दरात प्रारंभ करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button