अखेर राष्ट्रवादीच्या बॅनरवर एकनाथ खडसेंचे फोटो झळकले

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेली परिवार संवाद यात्रा सध्या जळगावात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात राष्ट्रवादीच्या (NCP) स्थानिक कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले होते. मात्र, यापैकी एकाही बॅनरवर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना स्थान देण्यात आलेले नव्हते. ही बाब पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळताच हालचाली सुरू झाल्या आणि नवे बॅनर तयार करुन एकनाथ खडसेंचे फोटो लावण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नाथाभाऊंना आपले म्हणून स्वीकारले, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्या समर्थकांनी जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनर लावले होते. मात्र या बॅनरवर एकनाथ खडसेंचे फोटो गायब असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गुलाबराव देवकर अजूनही एकनाथ खडसेंच्या बाजूने उभे नसल्याचे उघड झाले. मात्र वरिष्ठ नेत्यांनी गुलाबराव देवकर यांची मनधरणी केली आहे. त्यामुळे नव्याने बॅनर छापून एकनाथ खडसेंच्या फोटोंना स्थान देण्यात आले.

दरम्यान, पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भुसावळमध्ये लावलेले तब्बल 107 बॅनर्स नगरपालिकेकडून खाली उतरवण्यात आले आहेत. भुसावळ नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावण्यासाठी मागितलेली परवानगी देखील इलेक्ट्रिकल पोलचे कारण पुढे करून नाकारण्यात आली. त्यामुळे भुसावळमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी सध्या भुसावळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER