अखेर बारावीची परीक्षा रद्द; ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई :- देशभरात सध्या कोरोनाचा (Corona Virus) कहर सुरू आहे. गेल्या एका वर्षाहून अधिक काळापासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक महत्त्वाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा (12th Exam) रद्द करण्याचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता इयत्ता दहावीप्रमाणेच राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचंही मूल्यमापन केलं जाण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं केलं जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करून परीक्षा घेणं योग्य होणार नाही.

परीक्षा रद्द करण्याबाबत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना परीक्षा घेऊन पाल्य, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य होणार नाही. दहावीची परीक्षा रद्द केली, त्याच निकषावर बारावीचीही परीक्षा रद्द केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच या निर्णयाची माहिती उच्च न्यायालयात दिली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button