म्हणजे अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय यूजीसीच्या गाईडलाईनप्रमाणे नव्हता ! शेलारांचा ठाकरे सरकारला चिमटा

आतातरी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी

मुंबई : यूजीसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या परीक्षा या सप्टेंबरमध्ये घ्यायच्या आहेत. या परीक्षा ऑफलाईन (पेपर/ पेन पद्धतीने ), ऑनलाईन पद्धतीने किंवा संमिश्र पद्धतीने घेतल्या जाऊ शकतील असा निर्णय यूजीसीने घेतला आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना यूजीसीच्या निर्णयानंतर दिलासा मिळाला असेल असे म्हणता येईल.

मात्र, आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे व विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर केला पाहिजे, असे भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून म्हटले आहे. राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते ते सुदैवाने आता बचावले. आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला, विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा, असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे. देशातील विद्यार्थ्यांना नोकरी, उच्च शिक्षणात समान संधी मिळावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘एकसूत्री’ निर्णय घेतला.

शैक्षणिक आरोग्यासोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करून सप्टेंबरपर्यंत कालावधी वाढवून दिला. आता नोकरीच्या संधीत महाराष्ट्राचे विद्यार्थी मागे पडू नये, असेही शेलार यांनी ट्विटमधून म्हटले आहे. तसेच, अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे हा निर्णय यूजीसीचा नव्हता हे आता सिद्ध झाल्याचेही शेलार म्हणाले. आता राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. राज्य सरकारच्या निर्णयात कुलपती, कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवून यूजीसीच्या गाईडलाईनप्रमाणे तो निर्णय नव्हता हे स्पष्ट झाले! – असे ट्विट शेलार यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER