अखेर महाविकास आघाडीचं ठरलं, महामंडळावर लवकरच नाराजांची वर्णी लागणार

Mahavikas Aghadi

मुंबई : कोरोना (Corona virus) साथीच्या रोगामुळे रखडलेल्या महाआघाडी सरकारचे महामंडळ वाटप अंतिम टप्प्यावर आले आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांची बैठक झाली त्यात महामंडळाच्या वाटपावर अंतिम चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्या विभागाचे मंत्रिपद नाही त्या पक्षाला महामंडळाचं अध्यक्षपद या धोरणानुसार महामंडळ च वाटप होईल. यानुसार सिडको- काँग्रेस, म्हाडा- शिवसेना तर महिला आयोग- राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रीपदाच्या संख्यावाटपाच्या प्रमाणानुसार महामंडळाचे वाटप होणार असून सदस्य संख्याही त्याच आधारावर ठरणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हे सरकार असल्याने प्रत्येक पक्षाला मंत्रिपदं विभागून देण्यात आली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात मोजक्याच नेत्यांची वर्णी लागली. त्यामुळे अनेक जण नाराज आहेत.

महामंडळाच्या वाटपात त्या नाराजांना सामावून घेतलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ३५ ते ४० महामंडळांवर लवकरच नियुक्त्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारमध्ये असलेल्या तीन पक्षांमध्ये अनेक प्रश्नावर कुरबुरी वाढल्या आहेत. समन्वयाचा अभाव असल्याचेही अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळे महामंडळाचं वाटप करतांना चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून त्याला अंतिम रूप देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER