आता लक्ष १९ मे कडे

Badgeलोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. ६ टप्प्यातले मतदान आटोपले असून ४८३ जागांवर लढणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले आहे. आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील ५९ जागांची निवडणूक बाकी आहे. आणखी ६ दिवसांनी म्हणजे १९ मे रोजी ती होईल. मागच्या निवडणुकीत याच टप्प्यात भाजपने बहुमताचा आकडा गाठला होता. ह्या टप्प्यात भाजपला ५९ पैकी ३३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी मागच्या वेळेसारख्या जागा मिळणार नाहीत. सरकारविरोधात अंडरकरंट आहे, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. २३ मे रोजी मतमोजणी आहे तेव्हा काय ते कळेल.

ही बातमी पण वाचा:- युतीच्या निम्म्या आमदारांचे तिकीट कटणार? 

१९ मे रोजी मतदान होणाऱ्या जागांमध्ये वाराणसीची एक जागा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथून उभे असल्याने साऱ्या देशाचे लक्ष आता वाराणसीकडे वळले आहे. मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसने अजय राय तर समाजवादी पक्षाने शालिनी यादव यांना रिंगणात उतरवले आहे. २०१४ मध्ये मोदी इथूनच लढले होते तेव्हा त्यांच्याविरोधात ४१ उमेदवार होते. आज २५ उमेदवार आहेत. हौसेगवसे खूप आहेत. वाराणसीमध्ये तिरंगी सामना असला तरी चुरस नाही. भाजपचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे. २००४ चा अपवाद सोडला तर १९९१ पासून सतत ६ निवडणुकीत भाजप इथे जिंकत आला आहे. इथली जातीय समीकरणेही भाजपला अनुकूल आहेत. तीन लाख मुस्लिम मतदार असले तरी अडीच लाख ब्राम्हण मतदार आहेत.

प्रत्येकी दीड -दीड लाख कुर्मी आणि यादव समाजाची मतं आहेत. मोदी आरामात निवडून येतील अशी चर्चा आतापासूनच तिथे रंगली आहे. पण विरोधी पक्ष कुठलीही कसर बाकी ठेवायला तयार नाहीत. मोदींची कोंडी करण्याचे शक्य ते सारे प्रयत्न त्यांनी चालवले आहेत. विरोधी छावणीतले सारे सैन्य वाराणसीमध्ये जमा होत आहे. भाजपचे सरदारही डेरेदाखल होत आहेत. अखेरची लढ़ाई जिंकण्यासाठी अखेरचे डावपेच फेकणे सुरु आहे.