वीरप्पनच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शनास मनाई

Veerapan

बंगळुरु : काही वर्षांपूर्वी कर्नाटक पोलिसांशी झालेल्या कथित चकमकीत ठार झालेला कुख्यात ‘चंदन तस्कर’ वीरप्पन याच्या जीवनावर काढलेला ‘ वीरप्पन : हंगर फॉर किलिंग’ हा चित्रपट यूट्यूब, अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स यासह कोणत्याही समाजमाध्यमांतून किंवा ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वरून प्रदर्शित करण्यास बंगळुरू येथील दिवाणी न्यायालयाने अंतरिम मनाई केली आहे. ‘एएमआर पिक्चर्स’ ही कंपनी हा चित्रपट काढत असून तो लवकरच प्रकाशित होणार असल्याच्या जाहिराती केल्या जात होत्या. ते लक्षात घेऊन चित्रपटाच्या प्रदर्शनास आक्षेप घेणारा दिवाणी दावा वीरप्पन याची विधवा पत्नी व्ही. मुथ्थुलक्ष्मी यांनी दाखल केला.

त्यावर दिवाणी न्यायालयाने एकतर्फी अंतरिम मनाई हुकूम दिला. मुथ्थुलक्ष्मी यांच्यावतीने अ‍ॅड. एच. व्ही. प्रवीण गौडा यांनी असा युक्तिवाद केला की, वीरप्पन याच्याविषयी सरकारने इतकी वर्षे जो खोटानाटा प्रचार केला त्या आधारे वीरप्पन याचे खलनायकाचे व्यक्तिमत्त्व या चित्रपटाच्या कथानकात दाखवले जाणार आहे. असे करणे वीरप्पन याच्या कुटुंबीयांच्या खाजगीपणाच्या हक्काचे उल्लंघन असून त्यांच्या खासगी आयुष्यात नस्ती ढवळाढवळ करणे आहे. याने या कुटुंबाच्या सन्मानाने जगण्याच्या हक्कावर गदा येईल. हा चित्रपट ‘कॉपीराईट’ कायद्याचेही उल्लंघन करणारा आहे, असाही त्यांनी दावा केला. मात्र कसे ते त्यांनी स्पष्ट केले नाही.

याआधी विविध न्यायालयांनी आर. राजगोपाळ, फूलनदेवी आणि के. गणेशन यांच्या जीवनावरील चित्रपटांचे प्रदर्शन रोखले होते, याचा त्यांनी दाखला दिला. यावर अंतरिम मनाई हुकूम देताना न्यायालयाने नमूद केले की, वादीने केलेल्या प्रतिवादावर अविश्वास दाखविण्यास प्रथमदर्शनी तरी काही कारण दिसत नाही. त्यामुळे वादींच्या खासगीपणाच्या हक्काचे संरक्षण करणे गरजेचे आहे. प्रतिवादींना नोटीस काढून नंतर मनाई हुकूम देण्यावर विचार केल्यास दावा करण्यामागचा हेतूच कदाचित विफल होईल. त्यामुळे प्रतिवादींना नोटीस काढून एकतर्फी अंतरिम मनाई हुकूम देण्यात येत आहे. पुढील सुनावणी ६ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER