हिमालय पूल दुर्घटनेनंतर मनसेची बॅनरबाजी, गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील इतर पादचारी तसेच उड्डाणपूल किती धोकादायक आहे, हे दाखवण्यासाठी बॅनरबाजी करणाऱ्या मनसेच्या एका कार्यकर्त्यांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोस्टर लावून शहर विद्रुप करणे या कलमनुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यामध्ये लोकांमध्ये अफवा पसरवून भीती निर्माण केल्याचा प्रकार तपासात समोर आल्यास गुन्ह्यातील कलम वाढवण्यात येईल असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

ही बातमी पण वाचा : ‘बाळासाहेबांनी हीच भूमिका घेतली होती’; मनसेकडून विडिओ वायरल!

हिमालय पादचारी पूल दुर्घटनेनंतर दादर येथील प्लाझा सिनेमागृहाजवळील, वीर कोतवाल उद्यान या ठिकाणी एक बॅनर लावण्यात आले होते, या बॅनरवर ‘सावधान सावधान सावधान जागृत मुंबईकरांना सूचना ‘ टिळक ब्रिज हा साधारण १९२३ बांधला गेला आहे, सध्या मुंबईतील पुलांची परिस्थिती पाहता आपण स्वतःच्या जबाबदारीवर या पुलाचा वापर करावा. असा मजकूर लिहण्यात आला होता.या बॅनरवर कुठल्याही राजकीय पक्ष,अथवा कुठल्याही संस्था किंवा व्यक्तीचे नाव लिहण्यात आलेले नव्हते. या बॅनरमुळे पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरत असल्याचे लक्षात येताच शिवाजी पार्क पोलिसांनी बॅनर प्रकरणी महापालिकेला कळवले. पालिका अधिकारी अंबाजी माने यांनी सदर बॅनर काढून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली, सदर बॅनर हे मनसेचे पदाधिकारी प्रवीण नेरुळकर  यांनी लावला असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आले असून शिवाजी पार्क पोलिसानी नेरुळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी तपास सुरू असून या बॅनरमुळे अफवा पसरवली गेली असल्याचे निष्पन्न झाल्यास अफवा पसरवून जनसामान्यात भीती निर्माण केल्याप्रकर्णी गुन्ह्यात वाढ करण्यात येईल असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.