मंत्रालयातील अधिकाऱ्यांची पदे भरा; विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

nana patole -& Mantryalaya

मुंबई : मंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे न्यायालयाच्या निर्देशानुसार भरण्याच्या कार्यवाहीस गती द्या, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहेत. कक्ष अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता सूची जारी करून या कामासाठी विशेष सेल तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबतच्या बैठकीत पटोले यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.

ते म्हणाले की, तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी तयार करून पुढील कार्यवाही करण्यास गती द्या. कक्ष अधिकारी पदाच्या १९८६ पासूनच्या ज्येष्ठता सुधारित करण्याच्या कार्यवाहीस प्रदीर्घ कालावधी लागणार असून या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी, असेही पटोले यांनी सांगितले. मुख्य सचिव संजय कुमार यांनी विहित नियामांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

या बैठकीत सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सु. मो. महाडिक, विधी  आणि न्याय विभागाचे बु. झ. सय्यद, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव रा. को. धनावडे, उपसचिव टि. वा. करपते, वन विभागाचे अवर सचिव अ. म. शेट्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विष्णू पाटील आदींसह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER