कोरोना संक्रमित जहाजावरील वस्तू मोकळ्या जागेत टाकणाऱ्या त्या पाच जणांवर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल

रत्नागिरी/प्रतिनिधी : जयगड बंदरात लागलेल्या जहाजावरील कोरोना संक्रमित व्यक्तींचे तसेच जहाजावरील अन्य साहित्य, वस्तू रत्नागिरी शहरानजीकच्या अल्ट्रा टेक कंपनीच्या परिसरात फिनोलेक्स कॉलनी जवळच्या मोकळ्या जागेत टाकणाऱ्या पाच जणांवर रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रत्नागिरी शहरानजीकच्या फिनोलेक्स कॉलनी ते अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या रोडवर मोकळ्या जागेत टेम्पोतून पाचजण काही सामान टाकत होते. याची माहिती या परिसरातील स्थानिकांना झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी या लोकांना हटकले असता हे सामान आंग्रे पोर्ट जयगड येथील प्रिया 23 या जहाजावरील असल्याचे निष्पन्न झाले. या जहाजावरील covid-19 या विषाणूने संक्रमित झालेल्या व्यक्तीचे तसेच या जहाजावरील अन्य साहित्याची विल्हेवाट लावण्याकरिता सगळे साहित्य या कॉलनी परिसरात आणल्याचे त्यांनी कबूल केले. यामुळे या परिसरात राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला असता. या प्रकरणी श्री. सावके यांच्या तक्रारीवरून समीर कादर खान (रा. बाजारपेठ रत्नागिरी) असलम इस्माईल कार्लेकर, फकीर महंमद अली पांजरी, सिकंदर हसनमिया पटेल (सर्व रा. साखरतर मोहल्ला रत्नागिरी) आणि मिलिंद तुकाराम बनप (रा. घाणेकर आळी, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध भा. द. वि. क. २६९, २७०, १८८, साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER