मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ‘आप’कडून फसवणुकीची तक्रार दाखल

Uddhav Thackeray

अमरावती :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात अमरावती (Amravati) येथील चांदूर रेल्वेत फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने (AAP) ही तक्रार दाखल केली आहे. निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी जनतेला अनेक गोष्टींसाठी आश्वासित केले होते. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री पदावर बसले असतानाही मुख्यमंत्र्यांनी दिलेले एकही आश्वासन पुर्ण केले नाही म्हणून त्याच्याविरोदात फसवणुकीचा तक्रार आपच्या नेत्याने दाखल केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण –

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेनं (Shivsena) जेव्हा वचननामा जाहीर केला होता. त्या वचननाम्यात जनतेला अनेक आश्वासनं देण्यात आली होती. तसेच वचननाम्यातलं एकही वचन खोटं ठरणार नाही, असं जाहीरनामा प्रसिद्धीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

तसेच राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच वचननामा तयार केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेव्हा स्पष्ट केल होतं. परंतु घरगुती वापरातील वीज 300 युनिट पर्यंत 30 टक्क्यांनी दर कमी करणार असल्याचे शिवसेनेच्या वचननाम्यात असताना प्रत्यक्षात हे वचन पूर्ण न झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेत आम आदमी पार्टीने पोलीसांत तक्रार दिली.

एवढेच काय तर, देशात आणि राज्यात कोरोना महामारीचे संकट असताना 1 एप्रिल 2020 पासून वीज दरवाढ करून राज्यातील जनतेला ठाकरेंनी फसवले आहे. तसेच 3 रुपये प्रति युनिट प्रमाणे तयार होणारी वीज 15 रुपये प्रमाणे देऊन जनतेची लूट चालू आहे, असं आम आदमी पार्टीने म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

निवडणुकीपूर्वी 300 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर 30 टक्क्यांनी कमी करणार असे वचन होते. त्या वचनांवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या 56 उमेदवारांना निवडून दिले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर यांनी राज्यातील जनतेला दिलेली वचन पाळणे त्यांची राजकीय आणि नैतिक जबाबदारी होती. परंतु यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केली आहे. अशी तक्रार आम आदमी पक्षाच्या नेत्याने पोलिसांत दिली आहे. एबीपी माझा ने हे वृत्त दिले आहे.

ही बातमी पण वाचा : आपल्या राज्यात ‘दिशा’सारखा कठोर कायदा लागू करा, रोहित पवारांची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER