ऊस वाहतूकदार मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळी मुकादमांवर गुन्हे दाखल करा : आमदार आबिटकर

MLA Atbir

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन असल्याने ऊसतोडीकरीता मराठवाडा व विदर्भातील ऊस मजूर मुकादम यांचेकडून जिल्ह्यातील ऊस वाहतूकदार मालकांची दरवर्षी लाखो रुपयांची फसवणूक होत असून या टोळी मुकादमांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांचेकडे केली.

यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ऊसतोडीसाठी मजुरांचा पुरवठा करतो असे सांगून विदर्भ व मराठवाड्यातील मुकादमांमकडून कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदार मालकांची दरवर्षी लाखो रुपयांची फसवणूक टोळी मुकादमांकडून होत असतात. यामुळे अनेक वाहतूकदार यांनी साखर कारखान्यांकडून घेतलेला टोळी ॲडव्हान्स मुकादमांना देवून ऊस मजूर देण्याचे काम करतात. परंतू प्रत्यक्षात मात्र टोळी मुकादम लाखो रुपयांची ॲडव्हान्स घेवून प्रत्यक्षात टोळी न पाठविता फरार होतात. याबाबत टोळी मिळावी याकरीता संबंधीत वाहतूकदार मुकादमांचा शोध घेण्याकरीता बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली अशा विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये गेले असता टोळी मुकादमांकडून ऊस वाहतूक दारांना मारहाण करणे, अपहरणाचे खोटे गुन्हे दाखल करणे याबरोबर वेळ प्रसंगी जिवे मारण्याचा देखील प्रयत्न मुकादम व टोळ्याकंडून होतो.

याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी गेले असता तेथील पोलीस हे मुकादामांच्या सांगण्यानूसार काम करत असल्याचे दिसते. यामुळे ऊस वाहतूकदारांची दरवर्षी कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्याचे काम होत असल्यामुळे कोल्हापूर सारख्या सदन जिल्ह्यातील ऊस उत्पादकांवर आत्महत्या करण्याची वेळी आली आहे. यामध्ये काही वाहतूक दारांनी आत्महत्या केल्या असून फसवणूक झाल्याने काही कुटुंबे पुर्णपणे उद्वस्थ झाले असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक ही बाब गंभीर स्वरुपाची असून पोलीस प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. याबाबत ज्या ऊस वाहतूक दारांची फसवणूक झाली अशा निवडक वाहतूकदारांचे टोळी मुकादमांशी झालेले करार व नोटऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात झाल्या आहेत व त्यांचे पैसे ऑनलाईन बँकींगच्या माध्यमातून पाठविले आहेत अशा तक्रारीं घेवून पहिल्या टप्यात या कागदपत्रांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले.

यावेळी सरंपच धनाजी खोत, सर्जेराव पाटील, ऊस वाहतूकदार संघटनेचे सदाशिव चव्हाण, विक्रम पाटील, वसंत प्रभावळे, अनिल हळदकर, कृष्णात राजिगरे, रघुनाथ सारंग, सुभाष पाटील, जयवंत मोरे, कृष्णात वैराट, तानाजी कदम, संजय घरपणकर, युवराज सुतार यांच्यासह राधानगरी-भुदरगड तालुक्यातील ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER