‘गुन्हा दाखल करा, अनिल देशमुखही धमक्याच देत गेले’, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Anil Deshmukh - Chandrakant Patil

पुणे : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची काल पोलिसांनी केलेल्या चौकशीप्रकरणावरुन आता राज्याचं वातावरण चांगलेच तापू लागले आहे. पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत भाजप नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आजच दिले आहेत. त्यांच्या या इशाऱ्याची भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खिल्ली उडवली आहे. आमच्या नेत्यांवर खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाहीत. अनिल देशमुखही (Anil Deshmukh) धमक्या देत देत गेले, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा इशारा दिला. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी सर्व काही केंद्रावर ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या (Corona) अश्या संकटसमयी सत्ताधाऱ्यांनी याप्रकारचे राजकारण करणं बरोबर नाही. सत्ताधाऱ्यांनी रोज खोटे आरोप करणं थांबवावं, असं सांगतानाच दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या केसेस दाखल करता. खुशाल गुन्हा दाखल करा. आम्ही घाबरत नाही. अनिल देशमुखही धमक्या देत देतच गेले, असं पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटील हे सौम्य वाटले होते. पण इंजेक्शन दिल्यावर तेही पुढे जात असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोनवरूनच उपलब्ध झाले आहेत. त्यानंतर ऑक्सिजनबाबत बैठक झाली. मात्र, मोदी फोन उचलत नाहीत असा खोटा आरोप केला जात आहे. हा प्रचार थांबवावा, असं म्हणत महाराष्ट्रात लसीकरणाचा काळाबाजार होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर लसी वाया घालवण्यात आल्या. या लसींची श्वेतपत्रिका जाहीर करा. महाराष्ट्रातील जनता प्रचंड संतापलेली आहे. लसीसाठी वणवण भटकत आहेत. उद्या जर लोक मंत्र्यांच्या, आमदारांच्या घरात घुसले तर आश्चर्य वाटायला नको. एवढा लोकांमध्ये संताप आहे, असं ते म्हणाले.

हरभजन सिंगने मला फोन करून टेस्टिंग व्हॅन देतो म्हणून सांगितलं. मला जर हरभजन सिंग फोन करत असेल तर मुख्यमंत्र्यांना फोन येत नसतील का? लोक द्यायला तयार आहेत. पण सरकार पुढे यायला तयार नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करत आहात? तुम्ही का लोकांशी बोलत नाहीत, असा सवाल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. आम्ही नगरसेवक निधीतून दोन ऑक्सिजन प्लांट उभारणार आहोत. अजितदादांनी आमदार निधीतून हे काम करायला घेतलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. मी कोविडसाठी एक कोटी रुपये देण्याचे जाहीर करतो. ऊर्वरीत दोन कोटीही द्यायला तयार आहे, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button