लढा स्क्रीन टाईमशी आणि त्याच्या दुरुपयोगांशी !

Fight Screen Time and its disadvantages!

आज सकाळी पेपर वाचत असताना परत एक धक्कादायक बातमी वाचनात आली. मध्यंतरी पब्जी (PUBG) ने हाहाकार उडवला होता. दोन दिवसापूर्वी 26 जानेवारीला दुपारी आठव्या वर्गातल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली ,” द डेथ क्लॉक” (The Death Clock)या वेबसाईटवर आयुर्मान कॅल्क्युलेटर वर मृत्यूचे भाकीत बघून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे आणि त्यांनी ते संकेतस्थळ बंद करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी बोलताना पोलीस दलातील सायबर तज्ञांनी सांगितले की वेबसाईटवरील मृत्यूचे भाकीत तथ्यात्मक नाही. त्या वेबसाइटवर भाकीत दिले आहे .त्यांच्याकडे लाखो लोकांचा डाटा असू शकतो .त्याला अधिकृतता नाही .कोण किती दिवस जगणार हे कुणीच सांगू शकत नाही .वेबसाईटवर आउटलुक परिमाण आठवीच्या मुलाला समजणे अवघड आहे. त्यामुळे मुलांवर पालकांनी लक्ष ठेवावे असेही त्यांनी सांगितले.

आज ही घटना घडली , त्याआधी पब्जी आले. पुढे आणखीन काही येईल. म्हणूनच या सगळ्या क्षेत्राबाबत पालकांनी सजग राहणे फायद्याचे आहे. आठव्या वर्गातील मुल आणि तेही आजच्या काळातले म्हणजे फार लहान असतं नाही. अर्थात प्रत्येक व्यक्तीची संवेदनशीलता ही वेगवेगळी असते. मुळात एखाद्या छोट्याशा खेड्यातून आल्यानंतर हे सगळे नवीनही असू शकते. काही का असेना पण जी काय घटना आहे ती निश्चितपणे दुर्दैवाची आहे. आणि त्यासाठी आळस झटकून कामाला लागणे गरजेचे आहे.

त्यात भरीस भर म्हणजे सध्याचे सगळ्या शाळांचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी आजपासून पाचवीपासूनच्या शाळा पुढे सुरू झाल्या. पण ऑनलाईन क्लासेसमुळे वाढलेला स्क्रीन टाईम (Screen Time) पालकांसमोरची सगळ्यात मोठी समस्या होऊन बसली आहे. थोड्या मोठ्या वर्गांसाठी सहा तास शाळेचे ऑनलाईन कोचिंग, मग सहा ते सात तास इतर कुठल्या क्लासेसचे कोचिंग ,उरलेल्या सात तासात झोप, आणि चार तासात उरलेल्या काय काय करणार ? त्या सगळ्यांमध्ये सेल्फ स्टडीला वेळ केव्हा देणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे . मुळातच मुलांना उठल्यापासून झोपेपर्यंत सतत मोबाईल लागतो. काही करून ते मोबाईल मिळवण्याचा प्रयत्न करतात. मग भलेही त्याच्यावर कार्टून बघत बघू देत किंवा नर्सरी राईम्स बघू देत, या सगळ्यातून हळूहळू सवय लागतेच

पुढे आईला काही काम करायचं असेल, घरी आलेल्या पाहुण्यांशी किंवा मैत्रिणीशी गप्पा करायच्या असतील, किंवा मूल रात्री लवकर झोपत नसेल, कदाचित आईची स्वतःची मानसिकता किंवा शारीरिक तब्येत ठीक नसेल ,अशा वेळी सुरुवातीला आई लोकांना मोबाईलची खूप मदत झाली. मुलांना प्रवास कंटाळवाणा होऊ नाही म्हणून सतत त्यांच्या हातात मोबाईल दिल्या जातो. महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो. स्क्रीन बरोबर मुलांचा वेळ जाण्याची सुरुवात ही अशी होते. सुरुवातीला मुलांना किती सहजपणे गॅजेट्स हाताळता येतात, तेच आपल्याला कसे शिकवतात याचं कौतुकही होतं. आणि मग हे छोटसं हत्तीचं पिल्लू आपल्या मुलांच्या आयुष्यात प्रवेश करतो. आणि मग मोठा होत होत, मोठा हत्ती जसा घराच्या दारातून बाहेर पडू शकत नाही, तसा हा मुलांचा स्क्रीनचा वेळ , स्क्रीन चे एडिक्शन वाढत जातं. आणि सध्याच्या ऑनलाईन क्लासेस मुळे तर त्यात भलतीच भर पडलेली आहे. त्याचे परिणाम जे दिसायची आहेत ते दिसतच आहे आणि मुळात पालक संत्रस्त आहेत.

खरंच मुलांनी मोबाईल किती वेळ बघावा याच्या लिमिटेशन्स आपणच आपण ठरवायच्या आहेत. सहा वर्ष किंवा त्याखालील मुलांसाठी पंचेचाळीस मिनिट ते जास्तीत जास्त 90 मिनिटं एवढा वेळ ठीक आहे. सात ते बारा या वयोगटासाठी तीन तास. ह्या पेक्षा जास्त वेळ नको. पुढे सातव्या वर्गापासून पुढे थोडा जास्त वेळ चालतो. पण हे सगळं करत असताना काही नियम मात्र कंपल्सरी हवेत ,ते म्हणजे 20- 20 – 20 चा नियम ! म्हणजे प्रत्येक वीस मिनिटानंतर अगदी थोडासा ब्रेक आवश्यक आहे. शिवाय ऑनलाईन क्लासेस सुरू असताना मुलांना बसण्याची योग्य पोझिशन हवी. तिच्यामुळे एकूण शरीराची ठेवण व्यवस्थित राहील. दररोज काही वेळ छोटे-छोटे वॉर्मिन एक्सरसाइज, त्यांच्या वयाच्या लायक योगा, करायला लावावे. त्याचप्रमाणे मोबाईल किंवा लॅपटॉप हे एकतर डोळ्याच्या लेव्हलमध्ये, किंवा थोडे लेव्हल पेक्षा खाली असे असावे.
आपल्या मुलांमध्ये काही ही लक्षणे दिसत आहेत का याचाही शोध घ्या.

जसे मोबाईल किंवा गॅजेटस् बघत नसताना ते अस्वस्थ होते आहे का ? त्याचा स्क्रीन टाईम खूप जास्त आहे का ? एक विशिष्ट वेळ ठरवून जर मोबाईल हातात दिला नाही तर प्रचंड चिडचिड होते का? मोबाईलची क्रेविंग किती जास्त आहे? आणि अशी लक्षणे दिसली तरी फार panic न होता , काही गोष्टी कराव्या लागतील. कसा आहे ना? पालकत्व निभावत असताना मुलांकडून कुठल्या प्रकारचे बॉल्स टाकल्या जात आहेत हे माहीत नसतं .त्यामुळे सतत तत्पर राहून तशी तशी आपली बॅटिंग करावी लागते. समजा तुम्ही बॅटसमॅन आहात, मग आपल्या बॅट चा वापर कसा करायचा ? तर तोही B A T S च्या साह्याने !

B – Boardum . मुलं सतत तक्रार करत असतात. काय करू ? कंटाळा आला. अशावेळी सर्वप्रथम स्वतःला गिल्टी समजणे बंद करा. त्याला कंटाळवाणेपणा आला आहे, याला जबाबदार मी आहे किंवा मी कुठेतरी कमी पडतो आहे किंवा पडते आहे असं न समजता सुरुवातीला त्या मागच्या भावना जाणून घेणे गरजेचे आहे ? आणि त्यालाच प्रश्न विचारू शकतो की काय करूयात आपण? किंवा काय काय वेगळं करू शकतो? तुला काय वाटतंय किंवा तुला काय आवडेल ?
आपल्या मुलांच नेमकं कशाकशात मन रमत ? याची थोडीशी कल्पना असेल तर घरात थोडा पसारा होईल. परंतु ती साधन उघड्या पद्धतीने मांडलेली असली तर सोन्याहून पिवळं. कारण बरेचदा मुले त्यांचे उपाय तेच शोधतात. परंतु आपण सगळे गोष्टी आणून नीट कपाटात बंद करून ठेवतो. त्यासमोर दिसू द्या. कदाचित त्याचा मार्ग त्यालाच समजेल. आणि आपण त्याबाबतीत चिंता करण्याचे किंवा panic होण्याचं कुठलंही कारण नाही. कारण बोर होणे ही क्रिएटिव्हीटी ची पहिली स्टेप आहे, असं समजायला हरकत नाही.

A- अल्टरनेटिव्ह Alternatives. पर्याय. आपण आधीच सांगितल्याप्रमाणे कुठल्या गोष्टीत आपल्या मुलाचं मन रमू शकतो याचे निरीक्षण करून किंवा इतरही अनेक बोर्ड गेम्स ,मॉडेलिंग, फायटिंग, सिंथेसायझर ,गिटार वाजविणे ,बिया पेरून झाडं जगवणे. असे अनेक पर्याय असू शकतात. पण त्यांनी म्हटल्याबरोबर आपल्याला लगेचच सापडलाच पाहिजे याचा अट्टाहास करण्याची गरज नाही. थोडा विचार करताना तो पर्याय सापडू शकतो.

T – Time 

  • त्यासाठी time -टाईम लिमिट ठरवणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. मग कुठल्या वेळेवर बंधन घालायचं हे ठरवताना कोणत्या वेळी ते जास्त बघतात ? त्यावेळेला आपल्याला तो वेळ त्यांना द्यावा लागेल. रात्रीची वेळ. कम्पल्सरी गोष्टी सांगण्याची असू द्या हे नक्की .

  • दुसरी गोष्ट एकदा वेळ ठरवल्यानंतर त्याबाबतीत अतिशय स्पष्टता आणि सतत ,पक्केपणाने पालन करायचं आहे. कारण एकदा का आपण कुठेतरी ढील देतो आहे हे कळले की त्याचा फायदा मुले उचलतात हे 100% सत्य आहे. मग काहीही केलं तरीही शिस्त लागू शकणार नाही.
  • तो स्क्रीन टाईम earn करायला लावा. म्हणजे काही वयानुरूप असे tasks ठरवायचे. To do . म्हणून त्याची एक लिस्ट बनवायची. आणि त्याच्यासमोर ते काम मुलाने केल्यानंतर एक-एक स्टार द्यायचा. ५ दिवसांची, ५ स्टार्स झाले की मग रविवारी १/२ तास मोबाईल जास्त हातात मिळेल असे सांगता येते. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करावे लागते. हा संदेश त्यांना जातो आणि त्यातून आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षित असलेले टास्क करून घेता येतात.

S – support and surrounding. मुलांना काहीतरी करायचं असतं. मग ते काहीतरी वस्तू मागतात. काहीतरी पडत, सांडत, आणि मग आपला संयम सुटतो. पसारा, लोक काय म्हणतील या गोष्टी आपल्या फार महत्त्वाच्या असतात. परंतु असं असेल तर क्रिएटिव्हिटी एकदम थांबते. म्हणूनच आपली प्रेरणा, प्रोत्साहन मिळण्यासाठी तसे वातावरण उपलब्ध असणे खूप आवश्यक असते. त्यासाठी परस्परांमध्ये कम्युनिकेशन असणे, संवाद असणे. मुलांसाठी जे काय करायचं आहे त्यात आई बाबांमध्ये संवाद आणि एकमत असणे. हे आवश्यक आहे. त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी वेळ पाहिजे.

सध्या सगळ्या पालकांमध्ये वेळ नाही हा प्रॉब्लेम खूप ज्वलंत आहे. कुठेतरी काहीतरी सतत धावत राहायचं आहे .परंतु फ्रेंड्स ! त्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य पडलेल आहे. मुलांच्या वयाची शिस्त संस्कार करण्याचे महत्वाचे वय म्हणजे 0 ते 6 वर्ष ! या वयातच सगळ्या चांगल्या सवयी, शिस्त, विवेक शिकवता येतो .पण महत्त्वाचं म्हणजे कायमस्वरूपी कडक पहारा म्हणून आपण त्यांच्याकडे बघणार नाही , तर त्यांच्या त्यांच्या वयाचे होऊन खेळावं .नंतर मुले जास्त वेळ शाळेत जाऊ लागली की वेळच वेळ मिळतो. तोपर्यंत आपल्याला जे काय करायचं आहे त्याची पूर्वतयारी आपण करू शकतो. ज्यांचे करियर सुरु आहे , त्यांनी आपल्या पालकांची मदत घ्यावी, day care तर असतातच. पण घरी आल्यानंतर आपला वेळ प्राथमिकतेने तुमच्या चिमुरड्यांना द्या .आपल्या मित्र परिवारातील चार चार पालकांचा एक गट करून वेगवेगळ्या दिवशी, त्या त्या पालकांनी सांभाळायची असा सपोर्ट ग्रुप सुरू करता येतो.

स्क्रीन टाईम मर्यादित करण्यासाठी ज्या काही पद्धती आहेत त्या थोडक्यात आपण पाहिल्या.

परंतू वर पाहिल्याप्रमाणे एकूणच इंटरनेट आणि त्यावरील गेम्स ,विविध वेबसाइट्स यांच्या मुळे होणारे दुष्परिणाम करण्यासाठी भावनांकाला (E Q ) खूप महत्त्व आहे. त्याच प्रमाणे मुले आणि पालक यांच्या मध्ये संवादाची खूप गरज आहे. वेळ देणे ही पण खूप गरजेची गोष्ट आहे. मुले जर चांगल्या गोष्टीत बिझी असतील, चांगल्या आयडियाज राबवत असतील, आई-वडिलांबरोबर मुक्त चर्चा करू शकत असतील, अनुभवांची आणि भावनांची देवाणघेवाण होऊ शकत असेल, मुलांना आपला विश्वास वाटत असेल. तरच यातून मार्ग निघतील.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशन व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER