मोदींशी लढण्याऐवजी कोरोनाशी लढा; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोमणा

Devendra Fadnavis & CM Uddhav Thackeray

कोल्हापूर : आपल्या सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी लढण्याऐवजी कोरोनाशी लढावे, असा टोमणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरेंना मारला.

फडणवीस यांनी आज, शनिवारी दुपारी कोल्हापूरच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना स्थितीची माहिती दिली. त्यांनी दुपारी सीपीआर रुग्णालयाच्या कोविड सेंटरला भेट दिली. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कोल्हापुरात ऑक्सिजन बेड वाढविण्याची गरज आहे. याबाबत आरोग्यमंत्र्यांशी बोलेन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, समरजितसिंह घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर भाजपचे अध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन महिन्यांत वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेटी देऊन तेथील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. कामातील त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आज सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील कोरोना स्थितीची माहिती घेतली.

डरना हैं या लढना हैं?

बिगरभाजप मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे नाव न घेता, ‘लढायचे की नाही हे एकदा ठरवा’, असे म्हणाले होते. याबाबतच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, कोणीतरी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे की, आपली लढाई कोरोनाशी आहे; मोदींशी नाही. ती नीट लढली पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER