कुटुंब गच्चीवर झोपल्याचे पाहून डाव साधला

पावणेचार लाखांचा ऐवज चोरीला

Aurangabad

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील शिवपूरमध्ये मंगळवारी पहाटे धाडसी चोरी करण्यात आली. या घटनेत चोरांनी तीन लाखांची रोकड आणि ८३ हजारांचे दागिने लांबविले. तर चोरी केलेल्या कपाटातील दोन तोळ्याचे दागिने सकाळी पाहणी करताना सापडले. या घटनेनंतर शिवपूरमध्ये पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.

शिवपुरात दादासाहेब एकनाथ दुबिले (५२) हे कुटुंबीयांसोबत गच्चीवर झोपलेले होते. त्यावेळी मुख्य प्रवेशद्वाराचा कडीकोंडा आतून लावलेला होता. तर चॅनेल गेटलादेखील कुलूप लावण्यात आले होते. दुबिले कुटुंबीय झोपेत असल्याची संधी साधून मध्यरात्री अडीचनंतर चोरांनी चॅनेल गेट व प्रवेशद्वाराचा कडीकोंडा व कुलूप तोडले. त्यातून आत शिरल्यानंतर चोरांनी सुरुवातीला हॉलमधील तिजोरी तोडून तिच्यातील तीन लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली. तसेच त्यानंतर बेडरूमच्या दिशेने धाव घेऊन लोखंडी कपाटाचे कुलूप तोडले. त्यात असलेले ८३ हजारांचे दागिनेही लांबविले. पहाटे चोरीचा प्रकार दुबिले कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी वाळुज पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर श्वानपथक, ठसेतज्ज्ञांसह पोलिसांनी दुबिले यांचे घर गाठले. कपाट, कुलपावर उमटलेले चोरांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. तसेच श्वानाने घरापासून काही अंतरापर्यंत चोरांचा माग काढला. याप्रकरणी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक उंबरे करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER