
मुंबई : नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदावर कुणाची वर्णी लागते याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे. या पदावर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांची वर्णी लागेल, अशी दाट शक्यता आहे. राऊत हे सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.
पटोले यांनी राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर ही जबाबदारी ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याकडे द्यावी, अशी महाआघाडीच्या नेत्यांची अपेक्षा होती. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अस्तित्वात आल्यानंतर राऊत यांच्याकडे ऊर्जा खाते देण्यात आले. राऊत हे विदर्भातील महत्त्वाचे नेते असून, मागासवर्गीय समाजाचा चेहरा म्हणून त्यांची अध्यक्षपदी निवड होऊ शकते.
सध्या काँग्रेसकडे (Congress) सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे दोन ज्येष्ठ नेते असले तरी चव्हाण हे मंत्रिपदावर राहण्यास इच्छुक आहेत तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीच्या गोटातून प्रचंड विरोध आहे. त्यामुळे राऊत यांच्या नावाला पसंती मिळू शकते. या पार्श्वभूमीवर राऊत मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाले असून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. राऊत महाराष्ट्रात परतल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला