डोकावू या जरा व्यवस्थापन क्षेत्रात !

मानसशास्त्र (Psychology) म्हंटल की बहुरूपी अनेक पैलूंवर ,अनेक क्षेत्रात काम करणारे क्षेत्र असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एखाद्या मोठ्या किल्ल्यावरून सगळा परिसर न्याहाळण्यासाठी टेहळणी बुरुज असतात ना, ज्याने सगळ्या आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवता येते तसेच मानसशास्त्र वाटते मला ! कुठे माझी गरज आहे ? असे जणू ते वाट बघत असते कि मदतीला कायम सज्ज !

आज आपण थोडे व्यवस्थापन क्षेत्रात (field of management) डोकवू या. कारण प्रत्येक क्षेत्राचे, रंगरूप, कार्यपद्धती आगळीच असते. सारखेपणा फक्त तोच कि सगळ्याचा मध्यवर्ती माणूस आहे, आणि माणूस आहे म्हणजे” मन” आहे.

अशा विविध उद्योगांमधील व्यक्तींना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. पण अजूनही वरिष्ठ अधिकारी व आणि व्यवस्थापकीय स्तरावरील लोक यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. भारतीय कंपन्यांना अलीकडे यांचे महत्त्व पटत चाललेले आहे. तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण होऊन कामाच्या पद्धतीत बदल झाला .तरीही प्रशिक्षणाची योजना नसल्याने गुणवत्ता वाढत नव्हती.एका शहरातील कापड गिरणी बंद पडायला आल्यावर नाइलाज म्हणून प्रत्येक कामगारांच्या कामाचे म्हणजे कापडाचे धागे घेऊन ते का चुकतात ? याचा अभ्यास झाला. व्यक्तिगत प्रशिक्षण एकेकाला दिले गेले. आणि परिणामतः”मला महत्व दिले जाते आहे “या भावनेने त्यांचे मनोधैर्य वाढले असे वाचनात आले. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.

त्यावरून गुणवत्ता वाढीसाठी जास्त वेतन ,बोनस या कशावरही काम केलं तरी ,मुख्य गरज असते ती प्रत्येक कारखान्यातील माणसाला,” ही कंपनी आपली आहे” असे वाटण्याची. ही गोष्ट कुठल्याही प्रशिक्षणाने आणि पैशानेच साधेल असं वाटत असेल तर तो पूर्ण गैरसमज आहे.

भावनिक आपुलकी म्हणजे थोडक्यात असे की ,आपण कंपनीला हवे आहोत. मला इथे महत्त्व आहे. माझ्यावर ही जबाबदारी आहे .आणि माझी आणि माझ्या कुटुंबीयांची इथे काळजी घेतली जाते. असे प्रत्येक माणसाला वाटले पाहिजे .यातच व्यवस्थापकाचे कौशल्य आहे !यालाच मेन पॉवर हांडलींग स्कील म्हणू शकू.

हे अवलंबून असते, त्यातील व्यवस्थापक व्यक्तीवर! त्यासाठी ती व्यवस्थापन किती हुशार आहे, धोरणी आहे ,व्यवहार चतुर आहे ,याबरोबरच तिची भावनिक बुद्धिमत्ता किती ? याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचे # नीतीधैर्य म्हणजे उत्साहाने ,आत्मविश्वासाने काम करणे. याचे विविध भाग म्हणजे कामाची गती, गुणवत्ता ,कमिटमेंट, उत्साह, आशावादी दृष्टिकोन आणि जिथे काम करतो त्या संस्थेचा अभिमान, नेतृत्वावर विश्वास आणि संघभावना यांचा समावेश असतो.

तसेच # कार्यनिती ही पण सर्वत्र सारखी असते. याची नोंद कंपनीच्या कार्यनितीत सांगितलेली असते.

म्हणूनच यात फरक पडतो फक्त संस्थाचालकाच्या वागण्या बोलण्याचा ! बिहेविअरल पॅटर्नचा !औद्योगिक शांतता व आपुलकी तसेच व्यवस्थापकीय यश मिळवायचे असेल तर —

प्रत्येक कर्मचाऱ्याची आत्मप्रतिष्ठा आणि आत्मसन्मान जपला जायला हवा.: ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे .तो जपला गेला तर माणूस जीवाला जीव द्यायलाही मागेपुढे बघत नाही. म्हणून जर व्यवस्थापन करणारी व्यक्ती मनमोकळी, दिलखुलास ,आरस्पानी असेल तर ती वातावरणातील खेळकरपणा राखून ठेवते. येथे सगळ्यांना सारख्याच पद्धतीने वागवल्या जाते. आपण कोणीतरी वरिष्ठ म्हणून आता हाताखालच्या व्यक्तींना लवकर बसायला न सांगणे, वा ताटकळत ठेवणे यासारख्या गोष्टी होत असतील तर लोक मनातून हिरमुसतात.

विशेषतः एखाद्या कर्मचाऱ्याची चूक त्याला दाखवून द्यायची झाली तर ती, सगळ्या लोकांच्या देखत आरडाओरडा करत दाखवून दिली गेली ,तर यातून स्वतःची पत प्रतिष्ठा वाढेल असं वाटत असेल तर ते सपशेल चूक आहे .प्रत्यक्ष परिणाम उलटाच होतो. असे ओरडून मोठेपण सिद्ध होत नाही. तर आपल्या केबिन मध्ये किंवा एकट्याला बोलावून शांतपणे समोरच्याचे ऐकत, त्याची अडचण समजून घेत, जर त्याची चूक त्याला दाखवली गेली तर ती दुरुस्त होण्याची शक्यता शंभर टक्के असते.

दुसरी गोष्ट म्हणजे विचार आणि कृतीचे स्वातंत्र्य मिळायला हवे .तरच ते जबाबदारी उचलून समजून-उमजून पार पडतील. स्वयंशिस्त आपोआपच पाळली जाईल. म्हणूनच विश्वास ठेवून जबाबदारी सोपवणे हे व्यवस्थापनातील महत्त्वाचे तत्त्व आहे. अधिकारी जर ,”सगळे मी ठरवणार, मला विचारल्याशिवाय कोणी काही करायचे नाही ,अशी प्रवृत्ती असेल तर कामाच्या गतिशीलते वर व माणसांच्या काम करण्याच्या उत्साहावर पाणी पडते.

ही व्यवस्थापनातील तत्वे अगदी घरातील व्यवस्थापनाला ही लागू पडत असतात. बरेचदा स्वयंपाक वल्या मावशींना फार जास्त सूचना दिल्या जातात. आपल्या घरातील चवीप्रमाणे स्वयंपाक शिकणे हा उद्देश असतो .पण त्यांना खरा तर तेवढे शिकण्यात इंटरेस्ट नसतो .त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स असल्याने त्यांना करायचे त्या करतात. म्हणून फक्त त्यांना मेन्यू सांगून मोकळे झाल्यास बरेचदा चांगला स्वयंपाक होतो असे दिसते.

कुठल्याही कामाच्या ठिकाणी जबाबदारी जर पूर्ण सोपवली तर ते “आपले काम वाटते “.कसे करायचे याचे स्वतंत्र असल्याने ताण राहत नाही आणि मनापासून व चांगले काम करण्यावर भर दिला जातो.

तिसरी गोष्ट म्हणजे विश्वास. कौटुंबिक अडचणीच्या वेळी ताबडतोब मिळणारी मदत आणि इतर वैद्यकीय सेवा हे केवळ कंपनीचे धोरण म्हणून नाही ,तर त्या गोष्टी जर व्यवस्थापकाच्या मनातून होत असतील किंवा कर्तव्य म्हणून न राहता काळजीतून केल्या जात असतील तर वेगळा परिणाम मिळतो. संस्थेबद्दलचे आपुलकी वाढीस लागते. उदाहरणार्थ :मध्यंतरी एका कंपनीतील कर्मचाऱ्याच्या पत्नीला अचानक ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. पैशाची गरज तर वेळोवेळी पुरवल्या जात होती. व्यवस्थापक स्वतः भेटून चौकशी करत होते आणि इतरही सहकाऱ्यांना फोन करून तेथील व्यवस्थापकाने ्या कर्मचार्‍याच्या टचमध्ये राहून त्याला धीर देण्यास सांगितले होते. उशिरा आजार लक्षात आल्यानंतर दोन-तीन दिवसातच मध्यरात्री त्याच्या पत्नीचे निधन झाल्याचा फोन आला. पावसात व्यवस्थापक स्वतः गेले .त्याला धीर दिला. कोरोनामुळे बॉडी मिळायला उशीर लागत होता. तिचे सर्व कार्य गावाकडे करायचे ठरल्यावर तेथे कर्मचाऱ्याबरोबर पूर्ण वेळ थांबून, शेवटी ऍम्ब्युलन्स करून देऊन त्यांना गावा कडे रवाना करेपर्यंत ्यवस्थापक त्या कर्मचार्‍याच्या बरोबर होते. कारण त्या संकटकाळात तो कर्मचारी आणि त्याची छोटी मुलं याच्या पलीकडे त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं. कोरोनाच्या भितीचा कुठलाही बाऊ न करता असे कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभे राहिल्याने तो कर्मचारी कायमस्वरूपी कंपनीशी जोडला गेला.

शेवटी कुठलीही संस्था, कंपनी चालवणे हे फक्त पैसा ,,अधिकार आणि प्रशिक्षणाचे काम नाही तर तिथे भावनिक बुद्धिमत्ते चा रोल खूप महत्वाचा असतो हेच खरे !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER