ताव मारताच तिचा मूड होतो फ्रेश

Shivani Sonar

मूड खराब झाल्यानंतर आपण काय करतो? एखादं मस्त आवडीचं गाणं ऐकतो. आवडत्या ठिकाणी फिरायला जातो. छंद जोपासतो. अभिनेत्री शिवानी सोनारचा (Shivani Sonar) मूड खराब होतो तेव्हा ती काय करते माहिती आहे का? तर ती तिच्या आवडत्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारते. आवडते पदार्थ भरपेट खाल्ले की काही क्षणात तिचा मूड फ्रेश होतो. शिवानी सोनारचे हे सिक्रेट तिच्या ज्या मित्रमंडळींना माहित आहे ते नेहमीच तिला खायला घालून तिचा मूड मस्त बनवत असतात. सोशल मीडियावर हा किस्सा शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना दिलखुश करून टाकले आहे.

राजा राणीची ग जोडी या मालिकेतून सध्या घराघरात पोहोचलेली संजीवनी ढाले -पाटील ही भूमिका शिवानी करत आहे. तिला खायला खूप आवडतं. त्यातही मोमोज हा तिचा आवडता पदार्थ आहे.

शिवानी सांगते की, अभिनेत्री आहे म्हणून अनेकदा खाण्याच्या आवडीनिवडी .वर कंट्रोल ठेवावा लागतो हे जरी मान्य असलं तरी मला नेमकं तेच जमत नाही. त्यापेक्षा मी खाऊन पिऊन व्यायाम करण्यावर भर देते. खूप खाल्ल्यानंतर त्यांचं वजन पटकन वाढतं अशी माझी प्रवृत्ती आहे. त्यामुळे मला त्याची खूप काळजी घ्यावी लागते की मी जे खाते ते जास्त आहे का कमी यापेक्षा ते पौष्टीक असावे यावर माझा भर असतो. शिवानी सध्या सांगली येथे राजा राणीची ग जोडी या मालिकेचं शूटिंग करत आहे त्यामुळे साहजिकच ती तिच्या घरापासून लांब राहते.

शिवानीला पोटभरून नाश्ता करायला खूप आवडतं. तिचं म्हणणं आहे की जेव्हा आपण सकाळचा नाष्टा व्यवस्थित आणि पोट भरून करतो तेव्हा त्यातून प्रचंड एनर्जी मिळते. आणि जेवणाच्या वेळेपर्यंत काम करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा आवश्यक असते. माझा नाष्टा जवळपास जेवणाइतका असतो. शिवानी रोज संध्याकाळी सात वाजता न चुकता पोटपूजा करते कारण ती रात्रीचे जेवण करत नाही. शिवानीचा हा खाण्याचा फंडा तिच्या चाहत्यांना भलताच आवडला आहे.

काही जाहिराती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतील लक्ष्मीबाई ही छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर शिवानी सोनार हिला राजा राणीची गं जोडी या मालिकेत संजीवनी ढालेपाटील ही भूमिका करण्याची संधी मिळाली. लग्नाआधीची अल्लड आणि चुलबुली संजू लग्नानंतर गावातील बडं प्रस्थ आणि खानदानी रितीरिवाजाची परंपरा असलेल्या ढालेपाटील यांची सून या भूमिकेच्या दोन्ही शेडस् शिवानीने अगदी छान प्रकारे अभिनयातून दाखवल्या आहेत.

शिवानी ही खऱ्या आयुष्यातही खूप बिनधास्त आहे. मुळची पुण्याची असलेल्या शिवानीने एमआयटीमधून उच्चशिक्षण घेतले आहे. रंगभूमीवरून तिने अभिनयाचा प्रवास सुरू केला असून काही हिंदी लघुपटातही शिवानीला अभिनयाची संधी मिळाली आहे. अभिनयासोबत ती डान्स आणि मेकअप आर्टिस्टही आहे. लूक क्रिएशनमध्ये शिवानीला खास स्वारस्य असून एखादी साडी कोणत्या प्रकारची आहे त्यावर ती कोणते दागिने घालायचे, लूक कसा कॅरी करायचा याविषयीचे फोटो तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER