भाजीत भाजी मेथीची !

मेथी - Fenugreek

मेथीची भाजी प्रत्येक घरात आणली जाते. मेथीचे दाणे किंवा मेथीची भाजी किती फायदेशीर आहे याचे महत्त्व आपण जाणतो. त्यामुळे मुलांना पराठ्यांच्या रूपात थोडी तरी मेथी खावी हा विचार आई करते. कारण जेवढे गोड महत्त्वाचे तेवढे कडूदेखील महत्त्वाचे. मेथीचे वरण, पीठ लावून पातळ भाजी, मुटके असे किती तरी प्रकार मेथीचे केले जातात. आमटीत मेथीचे थोडेसे दाणे घालणे किंवा मेथांबा ( गुळांबा) हे सर्व वेगवेगळ्या रूपात मेथी आहारात घेण्याचे प्रकार आपण अगदी सहजतेने करतो.

आयुर्वेदात मेथिका पीतबीजा ( पिवळे बीज असतात) अशी नावे मेथीकरिता आली आहेत. मेथीचे दोन प्रकार असतात. लहान पाने असलेली भाजी म्हणून वापरल्या जाते. मोठी पाने असलेली मात्र पशू आहार म्हणून चारा स्वरूपात वापरल्या जाते. मेथी पचायला हलकी पण उष्ण असते. वात व कफ कमी करणारी आहे.

मेथी पोटशूळ, पोटात वायू धरला असेल तर मेथीदाणे कुटून गरम पाण्यासह घेतल्यास वायू कमी करून पोटदुखी कमी करते.

  • मेथी भोजनात रुची आणणारी आहे. जिभेला चव नसेल किंवा जेवणाची इच्छा नसेल तर मेथी भाजी फायदेशीर ठरते.
  • सूज किंवा गाठ, पू भरून फोड असेल, त्या जागी दुखत असेल तर मेथीदाणे वाटून त्याचा गरम लेप करावा. वेदना व सूज दोन्ही कमी होतात.
  • प्रमेहात मेथीची भाजी मेथीदाण्याचा वापर आहारात करावा.
  • मेथी वात कमी करणारी असल्याने वातामुळे होणारी अंगदुखी, अशक्तपणा यावर फायदेशीर ठरते.
  • मेथी उत्तम स्तन्यजनन आहे. बाळंतिणीचे दूध वाढविण्याकरिता मेथीची भाजी, मेथीचे लाडू खाण्यास देतात.
  • मेथी वात कमी करणारी तसेच उष्ण असल्याने प्रसूतीनंतर वात वाढू नये, शरीर स्थूल होऊ नये तसेच गर्भाशय शुद्ध होऊन साठलेले रक्त बाहेर काढते (आर्तव शुद्धी) त्यामुळे गर्भाशय पुन्हा सामान्य स्थितीत येण्यास मदत होते.
  • मेथी मेद कमी करणारी असल्याने स्थौल्य कमी करणारी आहे. मेथीदाण्याचे चूर्ण याकरिता फायदेशीर आहे.

मेथी वात कमी करणारी आहे म्हणून घेणे हितावहच आहे. परंतु उष्ण असल्याने रक्तपित्त व्याधी असल्यास वाढविणारी आहे. रक्तपित्त म्हणजे शरीरातून रक्तस्राव होत असेल म्हणजे घोळणा फुटणे, मूळव्याध, गुदमार्गातून, मूत्राद्वारे रक्त निघत असेल तर मेथीदाणे घेऊ नये.

बरेच जण मेथी आरोग्यासाठी चांगली म्हणून उगीच सकाळी मेथीदाणे खातात. पित्त प्रकृती, उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER