फिलिंग गुड : एक मूड थेरपी

Feeling Good

‘सुसंगती आणि आमच्या समजुती’ या मागील लेखात वाचल्याप्रमाणे आमच्या समजुती आणि आम्ही गृहीत धरलेल्या गोष्टी यांचा आमच्या आयुष्यावर खूप परिणाम होत असतो. आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्याला आलेले अनुभव, आपल्यापर्यंत आलेली माहिती आणि आपले परिसरातील, सहवासातील व्यक्ती, त्यांचे अनुभव या सगळ्यांचा खूप परिणाम आपल्या गृहीतकांवर, दृष्टिकोनावर होत असतो.

फिलिंग गुड ! ही नैराश्यावर मात करण्यासाठीची एक परिणाकारक मूड थेरपी डॉक्टर डेव्हिड बर्न्स यांनी मांडलेली आहे. एखादी घटना कुठलीही असो नकारात्मक, सकारात्मक किंवा न्यूट्रल. घटनेबाबत व्यक्तीच्या मनात एक संवाद सुरू असतो तो म्हणजे- मन संवाद! तो कसा आहे ? त्यानुसार आपले विचार, भावना आणि कृती घडत जात असतात. आणि परत ज्या दृष्टिकोनातून आपण त्या घटनेकडे बघू , त्या पद्धतीने ती घटना आपल्याला समजते, वाटते.

मागे उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या मनात येणाऱ्या काही चुकीच्या म्हणजे बोधात्मक चुका, चुकीच्या विचार पद्धतींची आज ओळख करून घेऊ, तेव्हा लक्षात येईल की, आपण खरंच किती चुकीच्या मार्गाने विचार करत असतो आणि आपणच नाराज आणि अपसेट होत असतो. त्यांनाच ‘cognative errors ‘असेही म्हणतात.

१) All or Nothing thinking : या विचारसरणीप्रमाणे आपण आपल्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण करताना किती टोकाच्या पद्धतीने करीत असतो ते लक्षात येते. यालाच ब्लॅक ऑर व्हाईट मेथडदेखील म्हणतात. काही लोक फार परफेक्शनिस्ट असतात. त्यांना एखादीही चूक स्वतःला केलेलीही नको असते, आणि म्हणूनच अपयशाची धास्ती मनात असते. कारण जर चुकून अपयश आलेच तर असे लोक स्वतःला पूर्ण अयोग्य, नापास ,अनुपयोगी समजतात . उदाहरणार्थ एखाद्या मुलाला बी ग्रेड मिळाली तर तो स्वतःला पूर्णपणे होपलेस समजतो. पांढरी किंवा काळी याच्यामध्ये कुठे तरी करडी शेड असते हे त्यांना माहितीच नसतं. पण वास्तविक पाहता असे मूल्यमापन पूर्णपणे अवास्तव आहे. कुठलीही गोष्ट पूर्ण योग्य, चांगली किंवा पूर्ण वाईट नसते.  म्हणूनच कुठलीही व्यक्ती पूर्णपणे बुद्धिमान किंवा पूर्णपणे असे कसे असू शकेल? आपण जर आपल्या अनुभवांना जर परिपूर्णतेचीच कसोटी लावून पाहात असू तर कायमच निराश राहू ! अशा आत्यंतिक अपेक्षा म्हणूनच स्वतःकडून आणि इतरांकडूनही करूच नये.

२) Overgeneralization : एखादी गोष्ट जर तुमच्या बाबतीत एखाद्या वेळी घडली, तर ती वारंवार तशीच घडेल असा विचार करणे. समजा आपण आपल्या टेरेसमध्ये उभे आहोत. तेथे आपण सुंदर गार्डन केला आहे . सुशोभित केले आहे. आणि तेवढ्यात वरून कुठल्या तरी पक्ष्याने  तेथे घाण केली. त्यावेळी माझे नशीबच फुटके, किती मेहनत घेतली, किती पैसे खर्च केले ,पण या पक्ष्याला  माझीच टेरेस दिसली का ? मग अशा वेळी विचारावंसं वाटतं की, ही मेहनत , हे सुशोभीकरण किती दिवसांपासून आपण करतो, तर इतके दिवस कधी असं घडलंय का?

एखाद्या मुलाला, एका मुलीने डेटसाठी नाही म्हटले; कारण त्या मुलीची एंगेजमेंट झालेली होती. पण यावरून हा निष्कर्ष निघत नाही की  तो शेवटपर्यंत नेहमीच योग्य मुलीकडून नाकारला जाईल. किंवा तो कोणालाच आवडणार नाही असा मुलगा आहे. आपण म्हणतो ना शितावरून भाताची परीक्षा किंवा सुतावरून स्वर्ग गाठण्याची प्रवृत्ती घातकच !

३) मेंटल फिल्टर : एक वाईट सवय आहे, जेव्हा आपण थोडे निराश असतो त्यावेळी एक स्पेशल चष्मा लावतो. यातून सगळ्या गोष्टींमध्ये नकारात्मकता आपल्याला दिसते. उदाहरणार्थ, सोनलला पेपर सोडल्यावर सारखं वाटत होतं की, आपण १०० मार्गांपैकी मध्ये १७ मार्कांचे काही सोडून दिले आणि काहींची उत्तरे चुकली आहेत. आणि तिला स्वतःबद्दल फारच होपलेस वाटू लागले .परंतु जेव्हा रिझल्ट हातात आला त्या वेळेला तिला १०० पैकी ८३ मार्क मिळाले होते. सोबत आणखीन एक पेपर जोडलेला होता त्यावर होतं, की  ती पूर्ण कॉलेजमधून highest marks मिळालेली स्टुडन्ट आहे. ८३ उत्तरे बरोबर याकडे दुर्लक्ष करून केवळ १७ कसे चुकले याकडेच लक्ष देत होती.

४) डिस्कॉलिफाइंग दि पॉझिटिव्ह : एक मानसिक भ्रम निर्माण करणारा चष्मा कायमस्वरूपी काही निराशावादी लोक लावून ठेवतात की काय ? काही लोक आपल्या परीसस्पर्शाने लोखंडाचे सोने करण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक मात्र स्वर्ण क्षणांनासुद्धा विरजण लावण्याचे कौशल्य मिळवलेले असतात आणि हेही पूर्ण नकळत! आपल्याही कदाचित बरेच वेळा आपण असे करतो आहोत असे लक्षात येते का?

कुणी आपल्या कुठल्याही गोष्टीचे कौतुक केले तर बरेच लोक ते स्वीकारू शकत नाही. “असं काय नि कसं काय ? त्यात काय एवढं !” वगैरे! म्हणजे प्रशंसा स्वीकारू शकत नाही ही एक गोष्ट. “ते काही फार कठीण काम नव्हतं. त्यात काय एवढं मी माझं कर्तव्यच केलं.” वगैरे म्हणताना दिसतात. तर काही लोक त्याहीपलीकडे! एका हॉस्पिटलमध्ये एक गंभीर पेशंट डॉक्टरांना माहिती देत होता की, तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. काळजी करत नाही. ती कुणालाच आवडत नाही. पण प्रत्यक्षात जेव्हा तिला डिस्चार्ज मिळाला त्यावेळी तेथील सगळ्यांचीच ती खूप आवडती बनलेली होती. मात्र याबद्दल ती म्हणाली की, हे खर्‍या जगात होत नाही आणि हे खरे वास्तव जग नाही. हॉस्पिटलबाहेर असे होत नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष जीवनातही तिला दाखवून दिल्या गेलं की, ती किती प्रिय आहे तेव्हा तिने परत उत्तर दिलेच की ते लोक ‘खऱ्या तिला’ ओळखतच नाही म्हणून ते असं म्हणतात.

५) जम्पिंग टू कन्क्लूजन : वस्तुस्थिती तशी नसताना सरळ सरळ नकारात्मक निष्कर्षाप्रत उडी मारण्याची प्रवृत्ती बऱ्याच जणांची असते. या प्रकारच्या विचारपद्धतीची दोन उदाहरणे असतात. त्यापैकी पहिला म्हणजे- माइंड रीडिंग  आणि दुसरा- फॉर्च्युन टेलर एरर.

आपण बरेचदा उगीचच दुसऱ्याच्या मनातल्या गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असतो. आपण एखादा प्रोग्राम सादर करतो आहे  तेव्हा आपोआपच समोरच्या प्रेक्षकांवरून नजर फिरत असते. आणि कुठे तरी एखाद्या प्रेक्षकाने जांभई दिली किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कंटाळा दिसला तर आपल्याला प्रोग्राम सादरीकरणामध्ये अपयश येत आहे, असे आपल्याला वाटते किंवा एखादा मित्र समोरून गेल्यावर ओळख पण नाही दाखवली किंवा एखाद्या फेसबुक पोस्टवर लाईक नाही आल्या तर ते फार नकारात्मकतेने घेतले जाते .माझ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असे म्हणले जाते. यालाच आपण माइंड रीडिंग अर्थातच चुकीचे, चुकीच्या दृष्टिकोनातून म्हणत असतो. आणि अशा गोष्टी दैनंदिन आयुष्यामध्ये खूप घडतात आणि गैरसमज वाढतात. फॉर्च्युन  टेलर एररबद्दल आणि इतर बोधात्मक चुकांबद्दल आपण ओळख करून घेऊ उद्याच्या लेखामध्ये !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER