फेडररच्या माघारीने टेनिस जगतातील दुटप्पीपणा उघड

Roger Federer -Naomi Osaka - Maharashtra Today
  • फ्रेंच ओपनसारख्या ग्रँड स्लॕम स्पर्धेला फेडररने बनवले एखादी सराव स्पर्धा
  • नवोदित खेळाडूंची संधी हिरावली आणि मतलबीपणा झाला उघड
  • विम्बल्डनच्या पूर्वतयारीचा हेतू करून घेतला साध्य

खेळांमध्ये नियम सर्वांसाठी सारखेच असतात असा दावा केला जातो पण व्यावसायिक टेनिसमध्ये (Professional Tennis) असे नाही असे दिसते. या खेळात राॕजर फेडररसारख्या यशस्वी (Roger Federer) , लोकप्रिय आणि आघाडीच्या (Greatest of all time- GOAT) खेळाडूसाठी वेगळे नियम आणि नाओमी ओसाकासारख्या (Naomi Osaka) अद्याप ग्रेटेस्ट (GOAT) न बनलेल्या खेळाडूसाठी वेगळे नियम आहेत असे समोर आले आहे. तसे नसते तर स्वतःला तंदुरुस्त राखण्यासाठी विश्रांती हवी म्हणून तिसऱ्या फेरीचा सामना जिंकल्यावरसुध्दा फ्रेंच ओपन 2021 स्पर्धा अर्ध्यातच सोडून दिल्यावरही राॕजर फेडररचा उदो उदो झाला नसता आणि मानसिक स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी पत्रकार परिषदा न करण्याचा निर्णय घेणाऱ्या नाओमी ओसाकाला हीच स्पर्धा सोडावी लागली नसती.

फेडररने सामना खेळू न शकण्यासारखी कोणतीही दुखापत नसताना पुढचे सामने खेळण्यास नकार दिला ते टेनिस जगताला चालले पण पत्रकार परिषदा न करण्यासाठी दंड भरुनही पुढचे सामने खेळायची तयारी दाखविलेली नाओमी ओसाका याच टेनिस जगताला चालली नाही. तिला दंड करण्यात आला, तिला धमकावले गेले, सहकारी टेनिसपटूंनी तिला एकटे पाडले आणि स्पर्धा अर्ध्यातच सोडण्यास भाग पाडले आणि आता स्वतःहून कोणत्याही सबळ कारणाशिवाय स्पर्धा सोडून देणाऱ्या फेडररबद्दल मात्र कौतुकच चाललेय. हा दुटप्पीपणा आता उघड झाला आहे.

फेडरर यशस्वी खेळाडू पण….?

फेडरर हा यशस्वी खेळाडू आहे यात शंका नाही. वयाच्या चाळीशीच्या उंबरठ्यावर असताना, गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झालेल्या असताना, जवळपास सव्वा ते दीड वर्षानंतर ग्रँड स्लॕम स्पर्धेत खेळत असताना, रिकाम्या स्टेडियममध्ये फ्लडलाईटच्या प्रकाशात मध्यरात्रीच्या पुढेही लांबलेल्या साडेतीन तासांच्या सामन्यात तो जर्मनीच्या डॉमिनिक कोफरसारख्या तरण्या खेळाडूला 7-6 (5), 6-7 (3), 7-6 (4), 7-5 असा भारी पडला याबद्दल त्याचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे पण हा सामना जिंकल्यानंतर स्पर्धेतून माघार घेण्याच्या त्याच्या निर्णयाचे समर्थन कसे करावे तेच कळत नाही.

स्पर्धेचा अनादर, कोफरचे नुकसान

त्याच्या या माघारीने एकतर त्याने ही स्पर्धा, प्रतिस्पर्धी खेळाडू आणि प्रेक्षकांचा अनादर केला आहे, शिवाय कोफरसारख्या खेळाडूची संधी हिरावून घेत त्याचे मोठे आर्थिक नुकसानही केले आहे. किंबहूना आपण ही स्पर्धा पूर्ण करू शकणार नाही हे माहित असतानाही खेळून आणि मध्यातच माघार घेऊन त्याने दुसऱ्या एखाद्या उगवत्या खेळाडूची संधी हिरावली आहे आणि फ्रेंच ओपनसारख्या ग्रँड स्लॕम स्पर्धेचा एखादी सरावासाठीची स्पर्धा असा वापर करून त्याने या स्पर्धेचा अनादरही केला आहे. फ्रेंच ओपन ही ग्रँड स्लॕम स्पर्धात सर्वात खडतर व खराब मानली जाते पण आता तिला एका सराव स्पर्धेचाही लौकिक फेडररने मिळवून दिलाय अशी चर्चा आता टेनिस जगतात आहे.

एवढंच नाही तर त्याच्या माघारीने चौथ्या फेरीत आता इटलीच्या मॕटिओ बेरैंटिनीला सामना न खेळताच पुढे चाल मिळणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे विश्रांती मिळणार आहे आणि त्यामुळे बेरेंटीनीचा जो कुणी प्रतिस्पर्धी उपांत्यपूर्व फेरीत असेल (जोकोवीच किंवा मुसेट्टी) यांच्यासाठी ती तोट्याची बाब ठरणार आहे.

संकेत आधीच मिळाले होते

मुळात यंदाची फ्रेंच ओपन सुरू होण्याच्या आधीपासूनच फेडरर ही स्पर्धा पूर्ण करणार नाही आणि दीर्घकाळानंतर खेळणार असल्याने विम्बल्डन स्पर्धेसाठी केवळ सराव म्हणून तो फ्रेंच ओपनकडे बघतोय हे दिसूनच आले होते. ही स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधीच फेडररने म्हटले होते की क्ले कोर्टवर खेळणे त्याच्यासाठी फार कठीण आहे आणि रोलँड गॕरोसवर तो जिंकू शकेल असे त्याला वाटत नाही. असे असतानाही तो का खेळला आणि आयोजकांनीही त्याला का परवानगी दिली हे कळेनासे आहे.

नियमात बदल गरजेचा

ही स्पर्धा फेडरर पूर्ण करणारच नव्हता हे जाणवण्याचे आणखी एक कारण म्हणजे तिसऱ्या फेरीचा सामना जिंकल्यावर चौथ्या फेरीच्या सामन्याआधी त्याच्याकडे रविवारचा पूर्ण दिवस होता ज्यात तो आपल्या फिटनेसचा आढावा घेऊ शकला असता. पण तो वेळही त्याने न घेता लगेच माघारीची घोषणा केली याचा अर्थ त्याची पुढचे सामने खेळायची मनाची तयारी नव्हतीच आणि आता अर्ध्यातच स्पर्धा सोडून दिल्याने त्याच्यावर कारवाई व्हायला हवी किंवा कोफरसारख्या ज्या खेळाडूची संधी त्याने हिरावून घेतली त्याला तरी पुढच्या फेरीत बढती दिली पाहिजे अशी मागणी आहे. एखाद्या खेळाडूने सामना जिंकल्यानंतर माघार घेतली तर त्याच्या पुढच्या प्रातिस्पर्ध्याला पुढे चाल देण्याऐवजी त्याने ज्या खेळाडूला हरवले त्याला बढती द्यावी असा नियम करण्याचीही मागणी आहे.

दुसऱ्या एखाद्या खेळाडूने ग्रँड स्लॕम स्पर्धेच्या तीन फेऱ्या खेळल्यावर माघार घेण्याची हिंमत तरी केली असती का? आणि ते खपवूनही घेतले गेले असते का, हासुध्दा अनुत्तरीत प्रश्न आहे. यामुळे या स्पर्धेतून फेडररला मिळणारी बक्षिसाची रक्कम व रँकिंग पाॕईंटस् देऊ नयेत अशीही मागणी आहे.

कोफरचे झाले मोठे आर्थिक नुकसान

ज्या कोफरला हरवल्यानंतर फेडररने माघार घेतली तो कोफर चौथ्या फेरीत खेळला असता तर त्याची बक्षीस रक्कम 57 हजार युरोने वाढली असती आणि त्याला जवळपास सव्वादोन लाख डॉलर मिळाले असते. कोफरसारख्या नवोदीत खेळाडूसाठी ही फार मोठी रक्कम आहे, विशेषतः कोरोनाने स्पर्धा रद्द झालेल्या नसताना आणि गेल्या वर्षभरात नवोदित टेनिसपटूंची कमाई प्रचंड घटलेली असताना कोफरसारख्या खेळाडूसाठी हे फार मोठे नुकसान आहे. फेडररने सामना जिंकून माघार घेत त्याला ह्या कमाईपासूनही आणि कदाचित आणखी पुढे जाण्याच्या संधीपासून वंचित ठेवले आहे.

फेडररला वेगळा आणि ओसाकाला वेगळा न्याय

विरोधाभास हा की आपल्या आरोग्य व तंदुरूस्तीसाठी जे बेस्ट आहे ते आपण करतोय असा दावा करताना फेडररने म्हटलेय की, गुडघ्याच्या दोन शस्त्रक्रिया आणि त्यातून सावरण्यासाठी वर्षभराच्यावर काळ गेल्यावर शरीराच्या गरजांकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे आणि म्हणून सावरत असताना फार घाई होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. ही काळजी घेत दुखापत नसताना त्याने माघार घेतली पण याच प्रकारे नाओमी ओसाकाने मानसिक स्वास्थ्याचा मुद्दा उचलला, स्वतःचे आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तो का चालला नाही. शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचे आणि मानसिक स्वास्थ्य नाही असे का असाही सवाल आहे आणि तो अनुत्तरीत आहे.

मुळात ओसाकाच्या पत्रकार परिषदा न करण्याच्या निर्णयाने कुणाचे नुकसान होणार नव्हते पण फेडररच्या निर्णयाने फ्रेंच ओपनच्या प्रतीष्ठेला धक्का पोहोचला आहे आणि कोफरसारख्या खेळाडूंचे नुकसान केले आहे. आपल्या स्वार्थासाठी त्याने या स्पर्धेचा उपयोग करून घेतलाय आणि तरी फ्रेंच ओपनचे आयोजक त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देताहेत हे विचित्रच असल्याची भावना टेनिस जगतात आहे. फेडररने सामन्यादरम्यान माघार न घेता सामना जिंकल्यानंतर माघार घेऊन प्रेक्षकांना चौथ्या फेरीच्या एका चांगल्या सामन्यापासूनही वंचित ठेवल्याची नाराजी आहे.

मॕकेन्रो बंधूंनीही व्यक्त केली नाराजी

जाॕन मॕकेन्रो व पॕट्रिक मॕकेन्रो यांनाही फेडररचा हा निर्णय रुचलेला नाही. जाॕन यांनी म्हटलेय की त्याने मॕचपाॕईंटवर असताना सामना सोडून दिला असता तर चालले असते पण….तर पॕट्रिक मॕकेन्रो यांनी म्हटलेय की, अशी मध्येच माघार घेणे बरोबर नाही. मला ते आवडलेले नाही. तुम्हाला दुखापत झाली तर मी समजू शकतो पण तुम्ही ही स्पर्धा पूर्ण करु शकणार नाही हे माहित असताना खेळणे चुकीचे आहे. फ्रेंच ओपनमध्ये सुरुवातीला का होईना सोपे सामने मिळतील अशी अपेक्षाच करणे चुकीचे आहे. खर तर त्याची ही विम्बल्डनसाठीच तयारी होतीआणि ती त्याने केली आहे असे अमेरिकेचे डेव्हीस कप कर्णधार राहिलेले टेनिस समालोचक पॕट्रीक मॕकेन्रो यांनी म्हटले आहे. राफेल नदाल, दानिल मेद्वेदेव आणि ख्रिस एव्हर्ट यांनी मात्र फेडररचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button