शतकवीर फेडरर!

पुरुषांमध्ये विजयाचे शतक गाठणारा एकमेव

Roger Federer

रॉजर फेडरर आणि विम्बल्डन ..या दोन गोष्टी एकत्र आल्या तर नवनवीन विक्रम होणारच! तसेच होतेय…जपानच्या केई निशीकोरीला चार सेटमध्ये मात देत त्याने 13 व्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली आणि विम्बल्डनच्या मैदानावरील आपला 100 वा विजय नोंदवला.

फेडरर वगळता कुणीही विम्बल्डनची एवढ्या वेळा उपांत्य फेरी गाठलेली नाही. जिमी कॉनर्स 11 वेळा विम्बल्डनच्या अंतिम चौघात होता. याशिवाय फेडररचे वय आता 37 वर्ष 336 दिवस आहे आणि त्याच्यापेक्षा अधिक वयात विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठणारा एकच खेळाडू आहे. तो म्हणजे केन रोझवाल. रोझवाल यांनी 1974 मध्ये अंतिम चौघात स्थान मिळवले तेंव्हा त्यांचे वय 39 वर्ष 246 दिवस होते.

निशिकोरीला दोन तास 36 मिनिटात दिलेली मात हा फेडररचा विम्बल्डनच्या हिरवळीवरील 100 वा विजय ठरला. एकाच ग्रँड स्लॕम स्पर्धेत विजयांचे शतक साजरे करणारा तो एकमेव पुरुष खेळाडू असून एकूण तिसरा टेनिसपटू आहे. मार्टिना नवरातिलोव्हाच्या नावावर विम्बल्डनचे 120 विजय आणि ख्रिस एव्हर्टच्या नावावर युएस ओपनचे 101 विजय आहेत. या दोघींनंतर एकाच ग्रँड स्लॕम स्पर्धेत विजयांचे शतक करणारा फेडरर हा पहिलाच पुरुष. त्याच्यानंतर जिमी कॉनर्सच्या नावावर युएस ओपनचे 98, स्वतः फेडररच्या नावावर अॉस्ट्रेलियन ओपनचे 97 आणि सेरेना विल्यम्सच्या नावावर विम्बल्डनचे 97 विजय आहेत.

या विक्रमांबद्दल फेडरर म्हणाला की, मी विजयांचे शतक साजरे झाल्याचा विचारही करत नव्हतो पण अॉटोग्राफ घेता घेता एका चाहत्याने ही माहिती दिली तर मी म्हणालो, हो खरंच! ठीक आहे!.

फेडरर यंदा 21 व्यांदा विम्बल्डनमध्ये खेळतोय आणि या 21 वारींमध्ये पहिल्यांदाच त्याचा सामना जपानी खेळाडूशी झाला. आता निशिकोरीविरुध्द विजय हा शुभसंकेतच आहे तो यासाठी की गेल्या चार ग्रँड स्लॕम स्पर्धात निशिकोरी ज्या कुणाकडूनही हरलाय त्या खेळाडूने पुढे जाऊन त्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेय. अर्थात आठ वेळच्या विजेत्या फेडररविरुध्द पहिला सेट जिंकून निशिकोरीने धोक्याचा इशारा दिला होता पण फेडररने धोका होऊ दिला नाही. 17 प्रयत्नात 13 व्यांदा फेडररने विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा ओलांडला. 77 ग्रँड स्लॕम स्पर्धात आता 352 विजय त्याच्या नावावर आहेत आणि इतर कुणापेक्षाही अधिक वेळा म्हणजे 45 व्यांदा त्याने ग्रँड स्लॕम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

ग्रँड स्लॕम स्पर्धांत सर्वाधिक विजय

अॉस्ट्रेलियन ओपन- फेडरर- 97
फ्रेंच ओपन – नदाल- 93
विम्बल्डन – फेडरर- 100
युएस ओपन – कॉनर्स- 98

विम्बल्डनमध्ये सर्वाधिक विजय

फेडरर -100
कॉनर्स- 84
बेकर- 71
जोकोवीच- 70
सॕम्प्रास- 63
मॕकेन्रो- 59
मरे- 57
नदाल- 53
बोर्ग- 51

ग्रँड स्लॕम स्पर्धांत फेडररचे विजय

विम्बल्डन -100
अॉस्ट्रेलियन ओपन – 97
युएस ओपन – 85
फ्रेंच ओपन- – 70