रॉजर फेडरर वर्षातील सर्वात धनवान खेळाडू

Roger Federer
  • रोनाल्डो व मेस्सीला टाकले मागे
  • टेनिस खेळाडू प्रथमच टॉपवर
  • टॉप १०० मध्ये बास्केटबॉलचे ३५ खेळाडू

स्वीत्झर्लंडचा नावाजलेला टेनिसपटी रॉजर फेडरर हा जगातील सर्वात धनवान खेळाडू ठरला आहे. प्रतिष्ठीत अर्थविषयक नियतकालिक फोर्बसने शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या यादीत गेल्या १२ महिन्यात १० कोटी ६३ लाख डॉलरची कमाई करून फेडरर सर्वाधिक कमाई करणाºया खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. फोर्बसतर्फे गेल्या ३० वर्षांपासून ही यादी जाहीर करण्यात येते.

गतवर्षी पहिल्या स्थानी असलेला अर्जेटिनी फुटबॉलस्टार लियोनेल मेस्सी तिसºया स्थानी गेला आहे. त्याची कमाई १० कोटी ४० लाख डॉलर आहे तर दुसऱ्या स्थानी आलेल्या पोर्तुगीज फुटबॉलस्टारची कमाई मेस्सीपेक्षा १० लाख डॉलरने अधिक आहे.

फेडररने २० ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या असून पुरुषांमध्ये तो सर्वात सफल टेनिसपटू आहे. त्याच्या कमाईपैकी १० कोटी डॉलरची कमाई ही जाहिरातींच्या माध्यमातून आहे. गेल्या वर्षी तो याच यादीत पाचव्या स्थानी होता. वर्षाला सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सर्वोच्च स्थानी पोहोचलेला तो पहिलाच टेनिसपटू आहे. फेडररचे नजिकचे स्पर्धक नोव्हाक जोकोवीच २३ व्या स्थानी तर राफेल नदाल २७ व्या स्थानी आहेत.

या यादीत फेडरर, रोनाल्डो व मेस्सीनंतर फुटबॉलपटू नेमार हा ९ कोटी ५५ लाख डॉलरच्या कमाईसह चौथ्या तर बास्केटबॉल स्टार लेब्रॉन जेम्स हा ८ कोटी ८२ लाख डॉलर कमावून पाचव्या स्थानी आहे.

कोरोनाच्या संकटामुळे फुटबॉल स्टार्सच्या मानधनात त्यांच्या क्लब्जनी कपात केल्याने मेस्सी व रोनाल्डोची घसरण झाली असून फेडररला सर्वोच्च स्थानाची संधी मिळाली आहे असे फोर्बस्चे ज्येष्ठ संपादक कुर्ट बादेनहौसेन यांनी म्हटले आहे.

महिला खेळाडूंमध्ये जपानी टेनिसपटू नाओमी ओसाकाची कमाई सर्वाधिक आहे. तिची कमाई ३ कोटी ७४ लाख डॉलर असून ती या यादीत २९ व्या स्थानी आहे.

टॉप १०० मध्ये बास्केटबॉलचे ३५ आणि अमेरिकन फुटबॉलचे ३१ खेळाडू आहेत. फुटबॉलचे १४, टेनिसचे सहा, बॉक्सिंग व मार्शल आर्टचे प्रत्येकी पाच आणि क्रिकेटचा एकच खेळाडू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER